संगमनेर: महावितरणच्या अभियंत्यास मारहाण करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
Breaking News | Sangamner: आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना.
संगमनेर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांना मनोली ता. संगमनेर येथील आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली होती. या खटल्याची सुनावणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात पूर्ण होवून आरोपीस तीन महिने सश्रम कारावास व बारा हजार रुपयांचा द्रव्यदंड, दंड न भरल्यास एक महिना कैद तसेच दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून देणे आणि सात हजार रुपये सरकार जमा करावे. तसेच मारहाण प्रकरणी एक महिना शिक्षा अशा दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेश न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी दिला आहे.
याबाबतची संपूर्ण हकीगत अशी, की २७ डिसेंबर, २०१८ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास महावितरणचे सहायक अभियंता प्रदीप नवनाथ गुंजाळ (वय ३८, रा. केडगाव, जि. अहमदनगर, हल्ली रा. मालदाड रोड, संगमनेर) यांना मनोली येथील राजेंद्र सुभाष बोर्हाडे यांनी संपर्क केला. त्यावर विद्युत पुरवठ्यामध्ये काही समस्या असतील म्हणून खात्री करण्यासाठी विद्युत सहायक निखील दिवाकर शेंडे यांच्याशी संपर्क साधून वडगाव पान येथील कर्मचारी भालेराव, दिघे व पाटील यांना घेऊन बोऱ्हाडे याच्या घरी गेले. तेव्हा दारुच्या नशेत असलेल्या बोर्हाडे याने थकीत वीजबिलापोटी खंडीत केलेल्या वीज पुरवठ्याचा राग मनात धरुन सरकारी कामात अडथळा निर्माण करुन लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.
याचवेळी सहकारी कर्मचारी अमोल बाळू पाटील हे वाद सोडविण्यासाठी मधे आले असता त्यांनाही कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात सहायक अभियंता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं. ९४/२०१८ भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल होता. याचा सखोल तपास करुन भक्कम पुरावे गोळा करत पोलीस उपनिरीक्षक डी. बी. उजे यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी सरकार पक्षाची जोरदार बाजू मांडली. यात एकूण चार साक्षीदार तपासले असता त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने तीन महिने सश्रम कारावास व बारा हजार रुपयांचा द्रव्यदंड, दंड न भरल्यास एक महिना कैद तसेच दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून देणे आणि सात हजार रुपये सरकार जमा करावे. तसेच मारहाण प्रकरणी एक महिना शिक्षा असा आदेश न्यायाधीश मनाठकर यांनी दिला. पैरवी अधिकारी म्हणून पो.कॉ. दीपाली दवंगे, सहा. फौजदार प्रवीण डावरे, पो.कॉ. स्वाती नाईकवाडी, प्रतिभा कोल्हे, नयना पंडीत, अनुराधा कासार यांनी सहकार्य केले.
Web Title: accused who assaulted the engineer of Mahavitaran was sentenced to hard labour