अहमदनगर धक्कादायक घटना! मुलानेच केला बापाचा खून
Ahmednagar News: दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच वडिलांचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
श्रीरामपूर | Shrirampur: दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून घरातील भांडी विक्रीला घेऊन जात असताना अटकाव केल्याने मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना गोंधवणी येथे घडली. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मयताच्या पुतण्याच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
दिलीप साहेबराव शेळके (वय 55, रा. गोंधवणी, वार्ड क्र.1, श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बबलू दिलीप शेळके (वय 31) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप साहेबराव शेळके (वय ५५) हे मुलगा बबलू शेळके याच्यासह गोंधवणी परिसरात राहतात. बबलू यास दारूचे व्यसन जडले होते. घरातील वस्तू विकून तो नशापाणी करीत होता. वडिलांमध्ये व मुलामध्ये पैशावरून नेहमीच भांडणे होत असत. बबलू हा ३१ ऑगस्टला रात्री ९ वाजता वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाहीत म्हणून दोघांत भांडण झाले. शेजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे भांडण असल्यामुळे दुर्लक्ष केले. १ सप्टेंबरला सकाळी दिलीप शेळके हा हालचाल करीत नव्हता. त्यास तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मयत दिलीप यांच्या डोक्यावर, गळ्यावर व छातीच्या डाव्या बाजूस मारहाण झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी मयत दिलीप यांचे नातेवाईक संतोष तुकाराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू याने वडील दिलीप शेळके यांना मारहाण करून जिवे मारल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता दि. 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार दादाभाई मगरे करत आहेत.
Web Title: Ahmednagar Crime son Murder the father