अहमदनगर: खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत
Ahmednagar News Live | अहमदनगर: पैशाच्या वादातून मजुराचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी (ता. नगर) शिवारात ताब्यात घेतले आहे. बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांकडे सपुर्द करण्यात आले आहे.
संजय पांडु पवार (वय 40) हे कुटुंबीयासह पिंप्री घुमरी (ता. आष्टी) येथे राहतात. त्यांचे वडील पांडूू हे बाभळीची लाकडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे गावातील बबन वारूळे याचे बरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरीवरून वाद झाला होता. त्यावेळेस संजय यांनी बबन वारूळे यांना आतापर्यंत झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करून देईल, असे म्हणून वाद मिटवला होता. परंतु, 21 जानेवारी 2022 रोजी पिंप्री ते घुमरी रस्त्याच्याकडेला सखाराम महादेव साबळे यांच्या घरापाठीमागे पांडू चंदर पवार (वय 60) हे जखमी अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच संजय यांनी खात्री केली असता, पांडू पवार यांचा खून झालेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. आष्टी पोलिसांनी आरोपी बबन हा अहमदनगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबन यास शेंडी शिवारात सापळा रचत पकडण्यात यश आले आहे. त्याला आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Web Title: Ahmednagar Fugitive accused in murder case arrested