Home अकोले अकोलेतील अल्पवयीन मुलीस मिळाला न्याय: मुलीस पळवून नेत केला होता अत्याचार

अकोलेतील अल्पवयीन मुलीस मिळाला न्याय: मुलीस पळवून नेत केला होता अत्याचार

Akole girl was abducted and Sexually abuse

Ahmednagar News Live | संगमनेर: अकोले (Akole) तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार (Sexually abuse) करणाऱ्या २७ वर्षीय युवकाला १० वर्षाचा तर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी हा गुरुवारी निकाल दिला.

मनिष उर्फ मॅडी ऊर्फ मनोज दगडू अहिरे (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) व प्रवीण रघुनाथ शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.सबंधित अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडीलांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भांगरे यांनी केला. त्यानंतर सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जी. बर्डे यांच्याकडे देण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच पिडीत मुलगी ही शिर्डी येथील पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी अकोले पोलिसांना संबंधीत मुलीविषयी माहिती दिली. त्यानुसार तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बर्डे यांनी शिर्डी येथून सदर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्यासह आई-वडीलांना अकोले पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर पीएसआय बर्डे यांनी पिडीत मुलीकडे चौकशी करुन जबाब नोंदवून घेतला. या चौकशी अंती जबाबामध्ये सदर पिडीत मुलीने सांगितले की, आपण चाकण येथे राहत असताना मनिष आहिरे हा नेहमी माझा पाठलाग करत असे, तु मला आवडतेस म्हणून बोलत असे, तु जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या आई वडीलांना जिवे मारेन, अशी धमकी तो देत असे. त्याला समजावून सांगण्यासाठी मी चाकण येथे गेले. तेथून मनिष याच्या मित्रांनी मला पुणे येथे नेले. तेथे मनिष भेटला. पुणे तेथून मनिष अहिरे याने मला मोटारसायकलवरून शिक्रापूर येथे आणले.

तिथे त्याचा मित्र प्रवीण रघुनाथ शेवाळे हा चारचाकी ओमणी गाडी घेऊन शिक्रापूर येथे आला. तेथून त्या दोघांनी चारचाकीमधून मला नगर येथे घेऊन गेले. तेथे एका शाळेच्या स्टाप रुममध्ये मला कोंडण्यात आले. तिथे मनिष आहिरे याने बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर प्रवीण शेवाळे याने देखील तेच कृत्य केले. गेली सात दिवस मी मनिष व त्याच्या मित्रांच्या ताब्यात होती. अखेर सातव्या दिवशी मनिष व त्याच्या भावाने मला तारकपूर येथून बसमध्ये बसून राहाता येथे घेऊन गेले व शिर्डी साई संस्थानजवळ सोडून दिले व दोघे पळून गेले.

त्यानुसार अकोले पोलिसांनी आरोपी मनिष ऊर्फ मॅडी ऊर्फ मनोज दगडू अहिरे (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) व प्रवीण रघुनाथ शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यांना तात्काळ अटक केली. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र अकोले पोलिसांनी न्यायालयात सादर केले. सदर खटला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदार यांच्या साक्षी पुराव्यावरुन व सरकारी वकील यांचा प्रबळ युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने पिडीता हिची साक्ष महत्वाची धरुन तसेच तिचा जन्माचा दाखला याबाबत ठाणे महानगर पालिकेचे साक्षीदार विनय पाटील व तपासी अधिकारी आर. जी. बर्डे यांची साक्ष ग्राह्य धरली. १० ते १८ सप्टेंबर २०१६ हा प्रकार घडल्याचा जबाब अल्पवयीन पिडीत मुलीने दिला होता. 

त्यानुसार आरोपी मनिष अहिरे यास भादंवि कलम 376(2)(1) 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 10 महिने साधी कैद, भादंवि कलम 363 मध्ये 3 वर्षे सक्त मजुरी, 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भादवी 342 मध्ये 1 वर्षे सक्तमजुरी तसेच पोक्सोमध्ये 7 वर्षे सक्तमजुरी, 7 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 महिने साधी कैद, आरोपी प्रवीण शेवाळे यास भादंवि 342 मध्ये 1 वर्षे सक्तमजुरी तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 मध्ये 3 वर्षे सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी सुनावली आहे.

सदर केस चालविण्यासाठी सरकार पक्षाला पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण डावरे, सहाय्यक फौजदार सुनिल सरोदे, सहाय्यक फौजदार सुरेश टकले, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली दवंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका डोंगरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी यांनी सहाय केले.

Web Title: Akole girl was abducted and Sexually abuse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here