अहमदनगर: महिला सरपंचासह लिपिकही लाचेच्या जाळ्यात- Bribe Case
Ahmednagar Bribe Case: रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी २० हजाराची लाच मागणी, महिला सरपंच व लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
अहमदनगर: रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी करणार्या निंबळकच्या महिला सरपंच प्रियांका अजय लामखडे (वय 35) यांच्यासह ग्रामपंचायतीचा लिपिक दत्ता वसंत धावडे (वय 40) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता धावडे याला ताब्यात घेतले आहे. येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष शिंदे, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक अंमलदार हारून शेख, तागड यांच्या पथकाने केली.
याबाबत माहिती अशी की, सोनेवाडी (ता. नगर) येथील ठेकेदार यांना निंबळक गावातील निंबळक-लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषदेकडुन मिळाला होता. त्यांनी सदर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करून केलेल्या कामाचे बील 13 लाख 65 हजार 56 रूपये मंजुरीसाठी जिल्हा परिषदमध्ये सादर केले होते. सदर बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते. ठेकेदार यांना 12 लाख 38 हजार 556 रूपयांचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीचा मिळाला होता.
त्यावेळी सुध्दा ठेकेदार यांच्याकडून पैसे घेतले होते व नंतरच चेक वर सही केली होती. ठेकेदार यांच्या बिलातील एक लाख 26 हजार रूपये रक्कम ‘जीएसटी’ पोटी ग्रामपंचायतने राखुन ठेवली होती. तक्रारदार यांनी ‘जीएसटी’ पुर्तता करून एक लाख 26 हजार रूपये रकमेचा चेकची ग्रामपंचायत निंबळक, ग्रामसेविका यांच्याकडे मागणी केली असता, ग्रामसेविका यांनी चेकवर सही करून चेक तयार ठेवला होता. परंतु सदर चेक वर सही करण्यासाठी सरपंच प्रियंका लामखडे यांनी ठेकेदाराकडे 20 हजार रूपयांची मागणी केली.
याबाबतची तक्रार ठेकेदार यांनी येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने मंगळवारी निंबळक येथे लाच पडताळणी केली असता सरपंच प्रियंका लामखडे व लिपिक दत्ता धावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयाची मागणी करून सदर रक्कम सरपंच लामखडे यांनी लिपिक धावडे याच्याकडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाल्यानंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन, असे सरपंच लामखडे यांनी सांगितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.
त्यावरून मंगळवारी निंबळक ग्रामपंचायतसमोर लाचेचा सापळा आयोजित केला असता लिपिक धावडे याने तक्रारदार यांच्याकडुन पंचासमक्ष 20 हजार रूपये लाच स्विकारली असता त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सरपंच लामखडे व लिपिक धावडे यांच्याविरूध्द लाच मागणीचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
Web Title: Bribe Case Women sarpanch and clerk also in the net of bribery
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App