ऊस तोडणी बैलगाडीला अपघात; महिला ठार, दोघे जखमी, तीन बैलाचा मृत्यू
Ahmednagar | Koaprgaon | कोपरगाव: सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीला जाणाऱ्या टायर बैलगाडीचा अपघात (Accident) झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. नगर मनमाड महामार्गावर येसगाव परिसरात साई लॉन जवळ ही घटना घडली आहे.
अज्ञात वाहनाच्या (ट्रक) धडकेत बैलगाडीचा चक्काचूर झाला असून यामध्ये ऊस तोडणी महिला कामगार मोनाबाई दादाजी पवार वय 27 वर्ष यांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर दादा अकडू पवार व कल्याबाई सुभाष अहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैलही जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगर मनमाड महामार्गावर येसगाव परिसरात साई लॉन जवळ ही घटना घडली आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात मालेगाव येथील केदा भिवसेन पाटील या मुकादमाची ऊस तोडणी कामगारांची टायर बैलगाडीची टोळी आहे. कारखान्यांमार्फत येसगाव शिवारात पहाटेच ऊस तोडणीसाठी टायर बैलगाडी मजुरांची टोळी चालली होती. सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दादा आकडू पवार यांच्या टायर बैलगाडीला जोरात धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर होत यामध्ये त्यांची पत्नी मोनाबाई दादाजी पवार यामध्ये ठार झाल्या तर दादाजी पवार व कलाबाई अहिरे हे गंभीर जखमी झाले. तीन बैलांचा मृत्यू होऊन दोन बैलही जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती समजताच अमृत संजीवनीचे ट्रान्सपोर्ट अधिकारी केशवराव होन घटनास्थळी हजर झाले. केशवराव होन यांनी सदर घटनेची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर दिवटे, शिंदे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, जनरल मॅनेजर औताडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली.
कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड, हवालदार श्री आंधळे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोल्हे कारखान्याची रुग्णवाहिकेसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.
Web Title: Cane harvesting bullock cart accident Woman killed