Home अकोले भंडारदरा परिसरात गाडी बुडाली, गुगल मॅपच्या आधारे गाडी चालवणे जीवावर बेतलं,  दोघांचा...

भंडारदरा परिसरात गाडी बुडाली, गुगल मॅपच्या आधारे गाडी चालवणे जीवावर बेतलं,  दोघांचा मृत्यू

Akole Accident: वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू (Death).  

Car sank in Bhandardara area Accident

अकोले: कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांची क्रेटा गाडी बुडाल्याची घटना घडली आहे. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याचवेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  औरंगाबाद येथील वकिल आशिष प्रभाकर पोलादकर,वय 34 रा.पोलाद तालुका सिल्लोड, रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 37) रा. ताड पिंपळगाव, ता.कन्नड,वकील अनंत रामराव मगर (वय 36) रा.शिंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील युवक संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच असणाऱ्या भंडारदरा आहे, तो पाहण्यासाठी ते आले होते. त्यांना भंडारदरा येथे जायचे होते, मात्र त्यांचा रस्ता चुकला ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशी फाट्याच्या पुढे गेले रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते.

यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटा कार थेट सरकत जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. याचवेळी बोलेरो गाडीतून एक प्रवाशी लघु शंकेसाठी थांबला होता, पण नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला. आज शनिवारी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

ही घटना परिसरातील शेंडी येथील राजू बनसोडे, दीपक आढाव या दोन युवकांनी पाहिली. त्यांनी तात्काळ राजूर पोलिसांना याची माहिती दिली. राजुर पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. मुसळधार पाऊस, घोंगवणारा वारा तरीही अंधारात सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, हेड कॉ्स्टेबल काळे, दिलीप डगळे, अशोक गाडे, विजय फटांगरे आदी पोलिसांनी मदत कार्य हातात घेत ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजता अपघातग्रस्त क्रेटा जेसीबीच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढली.

रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान,  बुडालेल्या युवकांचा मृतदेह घटनास्थळापासून 300 फुटावर सापडला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. गेल्या दहा दिवसांपासून भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसातही पर्यटक पाऊस व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भंडारदरा परिसराकडे येत आहेत. परंतु पावसामुळे या भागातील रस्ते व वाटा निसरड्या झाल्या आहेत. वळणाच्या ठिकाणी पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. आज याच कारणामुळे युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अॅड. आशिष पालोदकर हे अविवाहित होते. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते व जिल्हा कोर्टात वकिली करीत होते. रमाकांत देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते शेती करत होते. वाचलेला मित्र अनंत आपल्या मित्रांचे मृतदेह पाहून ओक्साबोक्शी रडू लागला, आणि बेशुद्ध पडला. त्याला राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांनी दिवस असेपर्यंतच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राजुर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Car sank in Bhandardara area Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here