Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल, धक्कादायक प्रकार समोर  

अहमदनगर ब्रेकिंग: लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल, धक्कादायक प्रकार समोर  

Ahmednagar Bribe Case:  लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचला, मात्र धक्कादायक प्रकार आला समोर. पोलिसाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

case has been registered against the policeman who demanded bribe

अहमदनगर : लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचला. सापळ्याच्या पद्धतीनुसार पडताळणी करण्यासाठी तक्रारदाराच्या कपड्यांत व्हाईस रेकॉर्डर ठेवून त्याला पुढे पाठवण्यात आले. मात्र लाचेची मागणी करणाऱ्या हवालदाराला याचा संशय आला आणि त्याने तक्रारदाराला एका खोलीत नेऊन झडती घेतली. हवालदाराने त्यांच्याकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेत तेथून पोबारा केला. पथकाने आता सदर पोलिसाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय ४२, पोलीस हवालदार, नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर) असं आरोपीचं नाव आहे.

लाचेच्या सापळ्याच्या कारवाईत उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शरद गोर्डे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोना रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड,वैभव पांढरे, चालक हारून शेख यांचा समावेश होता.  होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या कारणासाठी ५० हजार रुपयांची लाच मागण्यात येत होती, तो प्रकारही धक्कादायकच आहे. नगर तालुक्यातील देहेरे येथील एका किराणा दुकानदाराने यासंबंधी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली आहे. गावातील काही लोक त्यांच्या मुलांना शाळेत मिळालेला पोषण आहारातील तांदूळ या किराणा दुकानात आणून विकतात. हा विकत घेतलेला तांदूळ दुकानदार अहमदगर शहरातील मार्केटयार्ड मधील एका व्यापाऱ्याला विकतात. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी या व्यापाऱ्याच्या दुकानावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला होता. त्याच्याकडे काळ्याबाजारातील तांदूळ आढळून आल्याने त्याला अटक केली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी व्यापाऱ्याने आपण हा तांदूळ देहरे येथील किराणा दुकानदाराकडून घेतो, असे सांगितले होते. त्यामुळे पोलीस हवालदार एकनाथ पंडित निपसे याने किराणा दुकानदाराला बोलावून घेतले. दुकानदार व त्याच्या मुलाला या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे धाव घेतली. त्यानुसार उपअधीक्षक खेडकर यांनी सापळा रचण्याची तयारी केली. त्यासाठी आधी लाच मागितल्याची पडताळणी करावी लागते. तक्रारदारासोबत व्हॉईस रेकॉर्डर लावून पुन्हा संशयित आरोपीकडे पाठवून लाच मागितल्याचे संभाषण रेकॉर्ड करावे लागत असते. त्यानुसार पथकाने तक्रारदार किराणा दुकानदाराला त्या पोलीस हवालदाराकडे पाठवले.

तक्रारदार गुरूवारी पोलीस ठाण्यात आला. पंच आणि व्हॉईस रेकॉर्डर सोबत होता. बोलणेही झाले. मात्र, आरोपी पोलिसाला तक्रारदार व पंच यांचा संशय आला. त्यामुळे त्याने तक्रारदार किराणा दुकानदाराला एका खोलीत नेले. तेथे दरवाजा बंद करून त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या कपड्यांच्या आतमध्ये लपवण्यात आलेले डिजिटल व्हाईस रेकॉर्डर काढून घेऊन आरोपी पोलीस पळून गेला. त्यानंतर पोलीस पथकाने रात्रीपर्यंत त्याचा शोध घेतला मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचेची मागणी करणे, व्हाईस रेकॉर्डर बळजबरीने हिसकावून घेऊन जाऊन पुरावा नष्ट केला असा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करत आहेत.

Web Title: case has been registered against the policeman who demanded bribe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here