Ahmednagar News: एका विहिरीत आईसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले. सदर घटना ही आत्महत्या (Suicide) की घातापात.
पारनेर: तालुक्यातील नागापूरवाडी (पळशी) येथे एका विहिरीत आईसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना ही आत्महत्या की घातापात याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बायडाबाई सोमा बिचकुले (26), कांचन सोमा बिचकुले (5) व समाधान सोमा बिचकुले (2 वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.5) दुपारी माका नामदेव बिचकुले या शेतकर्याच्या विहिरीमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पळशी येथील लालु कोळेकर यांनी पाहीला. या घटनेची खबर कोळेकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस चौकीला दिली. घटना समजताच पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे, पोलीस हवालदार, प्रितम मोढवे, रवींद्र साठे, विवेक दळवी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.
पळशीचे सरपंच प्रकाश राठोड यांनी हा मृतदेह कांचन सोमा बिचकुले हिचा असल्याची ओळख पटवली. दरम्यान सायंकाळी तिची आई बायडाबाई सोमा बिचकुले हिचाही मृतदेह वरती पाण्यावर तरंगताना दिसून आला. मात्र मुलगा समाधान सोमा बिचकुले याचा मृतदेह मात्र मिळून आला नाही. ग्रामस्थ व पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाजेला बांधून, दोरांचे सहाय्याने विहिरीच्या पाण्याबाहेर काढले. काल (दि.6) सकाळी 7 वाजता विहीरीत समाधान याचाही मृतदेह सापडला. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान टाकळीढोकश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असून घटनेचे नेमके कारण समजले नाही. मात्र प्रथमदर्शनी आईने दोन मुलांसह आत्महत्या केलेली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Dead bodies of two children with their mother were found in the well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App