संगमनेर: मुसळधार पावसाने डोळ्यादेखत विहीर जमीनदोस्त, शेतमालही पाण्यात
Sangamner heavy rain News: शेतातील विहीर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाल्याची घटना, शेतजमिनीला पाझर फुटले आहे.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागात गेली चार महिन्यांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात सोयाबीन, टोमॅटो, बाजरी, झेंडू आदी शेतकऱ्यांचे शेतमाल पाण्यात बुडाले आहे. अशातच झालेल्या अतिवृष्टीने घारगाव गावाअंतर्गत असलेल्या कान्होरेमळा येथील शेतकरी सुनील शंकर डोंगरे यांची शेतातील विहीर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाल्याची घटना रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल शंकर डोंगरे हे आपल्या कुटुंबासोबत कान्होरे मळा परीसरात राहत असून तेथे त्यांची शेती आहे व शेतीत एकशे दहा फुट खोल विहीर होती. या विहिरीचे त्यांनी साठ फुटापर्यंत सिमेंट काँक्रिट मध्ये पक्के बांधकाम केलेले होते परंतु अतिवृष्टीने ही विहीर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालेली पाहून शेतकऱ्याला दुःख अनावर झाले आहे.
पठार भागात गेली चार महिन्यापासून होत असलेल्या अतिवृतीने पठार भागातील ओढे नाले भरुन वाहू लागले आहेत. सर्वत्र शेतीमध्ये पाणीच पाणी झालेले आहे. त्यामुळे शेतजमिनीला पाझर फुटले आहे. शेतजमिनी उपळू लागल्या आहेत. जमीनीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. विहीरीही पाण्याने काठोकाठ भरल्या असल्याने त्यातच या शेतकऱ्यांची विहीर जमीनदोस्त झाली असल्याने या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यापूर्वी देखील पठार भागात अनेक विहिरी अचानक जमीनदोस्त झाल्या आहे. वेळोवेळी शेतकऱ्याच्या विहिरींचे पंचनामे झाले परंतु त्यांना विहिरींची नुकसान भरपाई मिळाली नाही. शासन स्तरावरून अशा शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता पठार भागातील शेतकरी वर्गातून होत आहे.
Web Title: Due to the heavy rain, the wells were destroyed