Home अहमदनगर शेतकऱ्यांनी मागितला ऊर्जामंत्र्यांचा राजीनामा

शेतकऱ्यांनी मागितला ऊर्जामंत्र्यांचा राजीनामा

Farmers demand resignation of energy minister Nitin Raut

राहुरी | Rahuri : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे,अशी मागणी ईनिवेदनाद्वारे अखिल भारतीय क्रांतीसेना व शेतकऱ्यांनी केली आहे.

ईनिवेदनात म्हटले आहे की,उर्जामंत्री नितीन राऊत यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ट्विटरवर ट्विट करत महावितरण कंपनीच्या १५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकाचा संदर्भ देत कृषीपंप धारकांची थकबाकी सप्टेंबर 2020 च्या बिलात गोठवण्यात आली असून,यासाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये,असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही महावितरण कंपनीकडून कृषीपंपाला विद्युत पुरवठा करणारे रोहीत्र बंद करून वीजपुरवठा खंडित केला जात आहे.त्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी रोहीत्र बंद करून पठाणी वसुली चालु ठेवलेली आहे.आधीच शेतकरी कोरोना,अतिवृष्टी यामुळे मेटाकुटीला आलेला असताना आता पाणी उपलब्ध असताना देखील विजेअभावी पिके जाळायला लागली आहेत.तसेच महावितरण कंपनीकडुन कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कृषीपंप चालत नसुन नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महावितरण हिरावून घेत आहे.

जर नितीन राऊत यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर जनतेत हसु होण्यापेक्षा नितीन राऊत यांनी आपल्या ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे.तसेच कोरोना काळातील घरगुती वीजबिल थकल्याने ग्राहकांचे विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.त्यातच विद्यार्थ्यांच्या परिक्षा तोंडावर असल्याने आँनलाईन अभ्यासाचे फार मोठे नुकसान होत आहे.घरगुती विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घरगुती वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर अखिल भारतीय क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे,कोंढवडचे उपसरपंच इंद्रभान म्हसे,विजय म्हसे,भाऊसाहेब पवार,वेणुनाथ हिवाळे,बाबासाहेब म्हसे, जगन्नाथ म्हसे,गणेश भोईटे,शंकर माळवदे,राहुल हिवाळे,चंद्रभान म्हसे,नारायण म्हसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Farmers demand resignation of energy minister Nitin Raut

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here