Shirdi | शिर्डी: शिर्डी शहरात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे श्री साईबाबा मंदिराच्या मुखदर्शनाजवळील मंडप अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि.21 जून रोजी शिर्डीत दुपारी वादळी वार्यासह दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे साईमंदिर परिसरातील मुखदर्शनलगत असलेला मंडप कोसळला. पावसाच्या पाण्याचे वजन न पेलवल्याने सदरचा मंडप खाली पडला असून यात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कडक उन्हापासून भाविकांना सावली मिळावी यासाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर परिसर आणि भाविकांचा वावर असलेल्या ठिकाणी साईसंस्थानकडून प्रशासनाकडून मंडप टाकण्यात येतो. यात समाधी मंदिर परिसर, महाव्दार क्रमांक तीन, पाच, चार आदी ठिकाणी ठेकेदाराकडून मंडप टाकण्यात येतो.
सदरच्या मंडपावर पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे पाण्याच्या वजनाचा भार वाढला आणि मंडप खाली कोसळला. यावेळी मंडपाखाली कोणीही नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. या दुर्घटनेची भाविकांना जाणीव होताच त्यांनी तेथून प्रवेशद्वार क्रमांक तिनजवळ पलायन करुन आसरा घेतला.
Web Title: heavy rain, the pavilion near the front of Shri Sai Baba temple collapsed