दुध दरवाढीसाठी अकोले येथे किसान सभा व शेतकऱ्यांकडून दुधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात
अकोले: कोरोना पार्शभूमीवर राज्यात लॉकडाऊन करावे लागले, परिणामी बाजारपेठ ठप्प असल्याने सर्वसामान्य जनतेवर परिणाम झाला. एका बाजूला पशुखाद्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत तर दुसरीकडे लॉकडाऊनचे कारण सांगत दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.
त्यामुळे दुध दरवाढ मुद्यावरून शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. राज्यभर किसान सभेच्यावतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील आंबड गावात दुधाचा अभिषेक करत आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. किसान सभा व संघर्ष समिती मार्फत दुध उत्पादक मागणायांसाठी राज्यभरात तहसील कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली आहे. किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यात आंबड गावात दुधाचा अभिषेक करत आंदोलनास सुरुवात झाली आहे.
लॉकडाऊन अगोदर दुधाला ३५ रुपये प्रती लिटर भाव मिळत होता. तो २० रुपये करण्यात आला. तो पुन्हा ३५ रु. प्रती लिटर करण्यात यावा अशी मागणी संघटना करीत आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली गैरफायदा घेत दुध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दुध संघाकडून मोठी लुटमार करण्यात येत आहे. दुध संघांनी दुध खरेदीचे दर १० ते १५ रुपयांनी पाडले असून ग्राहकांसाठी विक्रीदर मात्र तसेच ठेवत ग्राहकांची व शेतकऱ्यांची लुटमार केली जात आहे असे आरोप या संघटना करीत आहे.
दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करीत आहे.
Web Title: Kisan Sabha and farmers in Akole started agitation