Home अकोले अकोले तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा; भात शेतीचे कोट्यवधींचे नुकसान

अकोले तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा; भात शेतीचे कोट्यवधींचे नुकसान

अकोले : तालुक्यातील उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर मात्र, रविवारी सायंकाळी निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर असून, सोमवारी सकाळी ते पूर्ण क्षमतेने भरेल व सकाळी आठ वाजता धरणातून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. भंडारदरा धरणातून सद्यस्थितीत २१ हजार ३५१ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून, मुळा नदीलाही पूर आला आहे. ५२ हजार क्युसेक्सने नदीतून पाणी वाहत आहे. अकोले तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. भात शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.

काल दिवसभर व रात्री भंडारदरा पाणलोट क्षेत्रासह मुळेच्या पाणलोटातही धुव्वाधार पाऊस झाला असून, भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे, मुतखेल, कोलटेंभे या गावात पावसाचे थैमान असून, भंडारदऱ्याला १६० मि.मी., घाटघर २७० मि.मी., रतनवाडी १७५ मि.मी., पांजरे १६६ मि.मी., वाकीला १४५ इतक्या पावसाची नोंद झाली असून, भातशेतीची खाचरे पूर्णत: पाण्यात गेल्याने भात पिके सडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भात शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील गावं गारठली असून, सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरेही गारठली आहेत. सर्व ओढे-नाले वाहू लागले असून डोंगरकडे, कपारीवरून पाणी धो-धो वाहत आहे. छोट्या-छोट्या नद्याही तुडूंब भरून वाहत असून आज रविवार असल्याने पर्यटकांचीही मोठी गर्दी पहायला मिळाली.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात उडदावणे, घाटघर, साम्रद, कोलटेंभे तसेच कळसुबाईच्या पट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, उडदावणे येथील नदीच्या पुलावरून पाणी तीन ते चार तास वाहत होते, तर पांजरे येथे धारवाडीच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याकारणाने वनविभागाने पर्यटकांना अभयारण्यात पर्यटनासाठी वाहने सोडणे काल बंद केले होते. पेंडशेत येथील कृष्णवंती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पेंडशेतचा जनसंपर्क तुटला आहे, तर घाटघर येथीलही जनसंपर्क पाण्यामुळे बराच वेळ तुटला होता.

प्रवरा नदीवरील दुसरे निळवंडे धरणही आज रविवारी दुपारी ५५०० दलघफूवर पोहचले होते. त्यानंतर सायंकाळी हा पाणीसाठा सात हजार दलघफूटवर पोहोचला. निळवंडे धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या सततच्या पावसाने निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक झाली. निळवंडे धरणही उद्या सोमवारी सकाळी ७७०० दलघफू झाल्यावर धरणातून उद्या सकाळी आठ वाजता पाच हजार क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

Website Title: Latest News Akola taluka Hits Heavy Rainfall; Billions Of Losses In Paddy Farming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here