Home अकोले अकोले: विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्यानी विरोधी पक्षनेते पदाची प्रॅक्टीस सुरु ठेवावी: देवेंद्र...

अकोले: विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्यानी विरोधी पक्षनेते पदाची प्रॅक्टीस सुरु ठेवावी: देवेंद्र फडणवीस

अकोले : आजची महाजनादेश यात्रेला उपस्थित असणारी मतदारांची गर्दी लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. आणि या आगामी निवडणुकीत महायुती राज्यात सत्तेवर व अकोलेत वैभवराव पिचड निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  व्यक्त केला.
       महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आज अकोले येथे श्री. फडणवीस यांच्या सभेने सुरू झाला. तेव्हा ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे होते. तर व्यासपीठावर पालकमंत्री प्रा राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार वैभव पिचड, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, रथयात्रेचे संयोजक आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार बाळासाहेब मुरकुटे, सौ हेमलताताई पिचड, रिपाई चे राज्य सचिव विजय वाकचौरे, मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणीस यावेळेस बोलताना म्हणाले, जनता रूपी देवतांचे दर्शन घेण्यासाठी आमचा महाजन जनादेश यात्रेतील संवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे. विरोधात होतो तेव्हा आम्ही संघर्ष यात्रा काढली. तर सत्तेत आलो तेव्हा संवाद यात्रा काढली. आमच्या सभेला मैदानी पुरत नाहीत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना मंगल कार्यालये ओस पडत आहेत. असा टोला लगावत सत्तेचा माजोरीपणा व मुजोरी वृत्ती यामुळेच यांना जनतेने झिडकारले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.आगामी २५ वर्षांच्या काळामध्ये मोदी व भाजप सत्तेत असतील. तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे आदींनी विरोधी पक्षनेते पदाची प्रॅक्टीस सुरु ठेवावी. मात्र त्यात सातत्य ठेवावे. अन्यथा त्यांना तेही पद मिळवता येणार नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक तेव्हढे आमदार तरी निवडून आणा.असा उपहासात्मक सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
   वैभवराव पिचड यांनी मागील पाच वर्षांच्या काळामध्ये शिस्तबद्धपणे व शांतपणे विधिमंडळात विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मांडले. विकासकामांसाठी निधी पदरात पाडून घेतला. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. हे पितापुत्र पक्षात आल्याने आता मतदार संघातील सर्वच प्रश्न आगामी काळात सोडवले जातील व पुन्हा दोन वर्षाने अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर येथील नवीन समस्या वगळता बाकीचे सर्व प्रश्न संपले असतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
आघाडी सरकार आणि युती सरकारची तुलना त्यांनी केली. गेल्या आघाडी सरकारच्या काळात पंधरा वर्षांमध्ये २० हजार कोटींचा निधी विकासकामांवर खर्च झाला. युतीच्या काळात पाच वर्षात ५० हजार कोटींचा विकास निधी खर्च पडला. याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या सरकारने राज्यांमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे ३० हजार किलोमीटरची कामे सुरु ठेवली असून त्यातील २२ हजार किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. ८ हजार किलोमीटरचे काम शिल्लक आहे. इतर राज्यांशी तुलना करता हे काम तिपटीने जास्त आहे. राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण रस्त्यांचे तालुक्यात काम शिल्लक राहणार नाही अशी आमदार पिचड यांना ग्वाही देऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधताना राज्यात २० हजार राष्ट्रीय, १० हजार राज्य व ३० हजार किलोमीटरची ग्रामीण रस्त्याची कामे आगामी काळात पूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेखाली सात लाख घरे बांधून पूर्ण झाले आहेत.बेघरांना घरे देण्याचा पंतप्रधान मोदी यांचा मानस आहे आणि २०२२ पर्यंत देशांमध्ये कोणीही बेघर राहू नये असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हे उद्दिष्ट २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल अशी हमी त्यांनी दिली. शिवाय अतिक्रमणे असणाऱ्या व्यक्तींच्या नावे त्या जमिनी कायम करण्याचे, साडेचार लाख घरे या अतिक्रमित जागेवर नियमित करण्याचे, आणि अकोले तालुक्यात मागेल त्याला तेवढी घरे देण्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यात बेघरांना घर, वीज,पाणी, शौचालय देण्याचे त्यांनी सूतोवाच केले. हे सांगताना त्यांनी देशात १८ व्या स्थानावर असणारे आपले राज्य शिक्षण दृष्टया तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. गुंतवणुकीसाठी आपले राज्य प्रथम क्रमांकावर असून आरोग्य सेवेत आता राज्याने सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे अशी माहिती देताना आदिवासी, विविध शैक्षणिक सोयी, सवलती, आदिवासी विद्यार्थ्यांची वसतीगृह व अन्य माहिती त्यांनी दिली. यामुळे मोठे परिवर्तन आदिवासींच्या बरोबर ओबीसी आणि मराठा समाजात होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
देश बदलला आहे. भारत जगाच्या पाठीवर आर्थिकदृष्ट्या मजबूत राष्ट्र बनत आहे. शेजाऱ्यांची आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. ‘सर्जिकल व एअरो स्प्रा स्ट्राईक’ ने दाखवून दिले आहे. ३७० व्या कलमाचा, त्याबरोबरच इतर बाबींचा उल्लेख करून मोदीजी यांच्या समवेत वैभवशाली देश आपण सर्वजण बनवू या आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा जनादेश, आशीर्वाद द्यावा अशी आवाहन केले. मोदीजी, फडणवीस, पिचड, राम शिंदे, गिरीश महाजन, वैभवराव आदींच्या नावांचा उल्लेख करून त्यांनी यावेळी या सर्वांना जनादेश आहे काय ? असे विचारले असता उपस्थितांनी ‘हो’ चा जबाब दिला.
       गृहनिर्माण मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोले तालुक्यातील जनता ही डाव्या विचाराची आहे. या तालुक्याने मोठ्या कष्टपूर्वक आपला प्रपंच फुलवला आहे. अशा या भागातील कष्टाळू जनतेला विकासाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी टाकावे. असे आवाहन त्यांनी केले आणि चळवळीच्या तालुक्यांमध्ये डाव्या विचाराच्या तालुक्यामध्ये उजवा विचार आता रुजला आहे तेव्हा ऐतिहासिक विक्रम गाठणारे मताधिक्य आमदार वैभवराव यांना विजयी करून मतदारांनी साधावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. 
      आमदार वैभवराव पिचड यांनी कोकणात वाहून जाणारे पूर्वेकडे वळवावे. तोलारखिंड व अन्य विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना शब्द टाकला.
      यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, वसंत मनकर, शिवाजी धुमाळ आदींची यावेळी भाषणे झाली.
 प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी तर सूत्रसंचालन गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केले.
कोट:- माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा महाराष्ट्र राज्याचे आदिवासींचे नेते असा गौरव मुख्यमंत्री यांनी केला शेवटच्या गावापर्यंत नाव पोहचलेले नेते आहेत
आपण विरोधात असताना वेगळया चष्म्यातून मुख्यमंत्र्यांकडे पाहत होतो. पण जवळ गेल्यावर वेगळे दर्शन घडले:- आमदार वैभव पिचड
अकोले शहरात महाजनादेश यात्रे ला शहरातून उस्फुर्त प्रतिसाद लाभला. 
Website Title: Latest News CM devendra fadnavis maha janadesh yatra in Akole 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here