Ahmednagar News: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची निनावी बातमी (Fake Call).
अहमदनगर: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची बातमी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धडकली. मुंबई पोलिसांनी मंत्रालयात धाव घेतली. बॉम्ब शोध पथकाला पाचारण करत शोध मोहीम राबवली. पण, बॉम्ब आढळून आला नाही. पोलिसांनी शोध घेतला असता हा फोन शेवगाव तालुक्यातून आल्याचे समोर आले.
बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे ( रा. हासनापूर, ता. शेवगाव) या इसमाने हा फोन केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास डायल ११२ वर एक कॉल आला. हा कॉल शेवगाव तालुक्यातील कोरडगाव येथून होता. त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा व्यक्त करत मंत्रालयात बॉम्ब ठेवलेला आहे. जर माझे बोलणे मुख्यमंत्र्यांशी करून दिले नाही, तर बॉम्बने मंत्रालय उडवून देईल, अशी धमकी दिली. या निनावी फोनने पोलिस यंत्रणा सतर्क झाली.
मुंबई पोलिसांनी मंत्रालय गाठले व बॉम्ब ठेवला आहे का याबाबत शोधमोहीम राबवली गेली. दरम्यान बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेतला. तेंव्हा फोन कोरडगाव येथून आल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला.
पोलिसांचे एक पथक कोरडगावात दाखल झाले. अखेर पोलिसांना फोन करणारा बाळकृष्ण ढाकणे मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो दारू पिल्याचे निष्पन्न झाले. त्याने दारू पिऊन हा फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Web Title: Let him talk to the Chief Minister, otherwise a bomb will explode fake Call
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App