आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी काही टिप्स
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी काही टिप्स:
विजेच्या अपघातापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबिय तसेच मित्रमंडळींचा बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स
आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो दाखलही झाला आहे. १ आठवडा होत नाही तर राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. हा आकडा वाढत असून विज अंगावर पडणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. काही दिवसांतच या पावसाचा बररसण्याचा वेग वाढेल आणि मग ढगांचा गडगडाट, विजा चमकणे अशा गोष्टी वेगाने सुरु होतील. पाऊस सुरु झाली की ठिकठिकाणी शेतीची कामे सुरु होतात. शेतात या घटना घडण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अपघातापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबिय तसेच मित्रमंडळींचा बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स समजावून घेणे आवश्यक आहे. पाहूयात काय केल्यास आपण विजांपासून बचाव करु शकू…
- शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
- शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
- ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
- पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
- पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
- एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
- पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
- आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
- जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
- वृक्ष, दलदलीचे ठिकाण किंवा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
- मोकळ्या आकाशाखाली असणाऱ्यांनी एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
- असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.
- चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
विजा चमकत असताना शक्य असल्यास या गोष्टी टाळा
- खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
- झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
- विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
- गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
- दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.
- एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
- धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
- पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांपासून दूर रहा.
- विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू इत्यादीपासून दूर रहा.
- प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा तसेच मोबाईलचा वापर टाळा.