Home अकोले किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यासाठी भिक नको पण कुत्रं आवर – मधुकरराव...

किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यासाठी भिक नको पण कुत्रं आवर – मधुकरराव नवले 

किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यासाठी भिक नको पण कुत्रं आवर – मधुकरराव नवले 

अकोले :दारात आलेल्या भिकाऱ्याच्या झोळीत इच्छा नसताना रुपयाचे नाणे फेकणे ही जितकी हीन प्रवृत्तीने वागवण्याची रित असते तद्वत शेतकऱ्याला गाजावाजा करीत वर्षाला ६००० रु. अनुदान देण्याची केंद्रसरकारची रित शेतकऱ्याला लज्जा निर्माण करणारी आहे. ‘अन्नदाता’, ‘शेतकरी राजा’ या बहुमानाच्या उपाधी शेतकऱ्याला बहाल केल्या जातात. ‘बळीराजा’ हा तर पदम् पुरस्काराला लाजवील असा बहुमान आहे. म्हणायचे बळीराजा व बळी द्यावयाचा मात्र त्याचाच ही राजनीती भा.ज.पा. सरकारने कालपर्यंत वापरली आहे. शेतकऱ्याने पिकवायचे व खाणाऱ्याला स्वस्तात द्यायचे ही स्वस्ताईचे श्रेय लुटायची निती संतापजनक व क्रुर मानसिकतेची ओळख आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत काल-परवा झालेली वाढ, विजेचे वाढलेले दर या अलीकडच्या शेती व्यवसायातील दरवाढी आहेत. वर्षानुवर्षे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढतोय व बाजारातील शेतमालाच्या किंमती कोसळतात. कोणत्याही पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्याला त्याने केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर हेक्टरी ३० ते ५० हजार निव्वळ तुट येते. श्रमाचे मोल तर नाहीच प्रसंगी ही तुट कमालीची वाढते. अशा स्थितीत शेतकऱ्यावर उपकाराचे ओझे टाकून त्याची मते घेण्यास निघालेले भा.ज.पा. सरकार ‘निवडणूक जुमला’ म्हणून केवळ वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्याला देणार आहे. शिवाय तीन हप्त्यात व अनेक अटी-शर्थी लादुन ते शेतकऱ्याला मिळणार नाही याचीही दक्षता घेणारच आहे. एका दिवसाला १६ रु. ४४ न.पै. अनुदान. ही योजना म्हणजे शेतकऱ्याची अत्यंत क्रुर थट्टा आहे. द्यायचेच तर मुठ आवळून का धरावी?  शेतकरी बहिण-भावांनी हे राजकारण ओळखावे. सरकारलेखी शेतकऱ्यांची किंमत कळाली.  वाडवडिलांनी सांगितलेली म्हण आठवावी ‘भिक नको पण कुत्रं आवर’ हे म्हणण्याची ही वेळ आता आली आहे. सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून बळीराजाला लाचार बनवू पाहत आहे. आणखी सजग होणे गरजेचे झाले आहे  अन्यथा भाषणांना आणि घोषणांना बळी पडून परत एकदा मरणाच्या चक्रव्युहात आपण अडकून पडू याची जाणिव आता ठेवावीच लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी किसान सभेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मधुकरराव नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

Website Title: Madhukarrao Navale Farmer honor plan


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here