Home संपादकीय आधुनिक भारताचे खरे शिल्पकार : महात्मा जोतिबा फुले

आधुनिक भारताचे खरे शिल्पकार : महात्मा जोतिबा फुले

“आधुनिक भारताचे खरे शिल्पकार – महात्मा जोतिबा फुले”……

महात्मा फुलेंच्या वेळचा कालखंड म्हणजे १८ व्या शतकात हजारो वर्ष बहुजन समाज गुलामगिरीच्या गर्तेत बुडालेला होता. वर्णवादी घोड्यांच्या टापाखाली चिरडला गेला होता. त्यांच्या अब्रूची लक्तरें वेशीवर टांगली जात होती. जातीपातीचे प्रचंड स्तोम माजलेलं होतं. सळसळत्या रक्ताची धगधगती दौड थांबली होती. भारतीय समाज तेजोहीन झाला होता. माणसाला माणसाची आठवण उरली नव्हती, वास्तवाचे भान उरले नव्हते. श्रीमंतांनी आपलं सुख आणि गरीबांनी आपलं दु:ख जपून ठेवायचं, अशा रीतीने सामाजिक गुलामगिरीचा अंधकार सर्वत्र पसरलेला असताना ज्यांच्या पावलांनी सार्वजनिक सत्यधर्माची पहाट या देशात उगवली ते गोविंदराव फुले आणि चिमणाबाई फुले यांच्या उदरातून एका क्रांतीसूर्याचा उदय झाला. अस्पृश्यांचा कैवारी, थोर शिक्षण महर्षी, स्त्रीयांचा आश्रयदाता, महात्मा जोतीराव फुलेंचा जन्म झाला.
त्या काळात स्त्रीयांसाठी शिक्षणाचे कार्य राबविणे म्हणजे अग्नीदिव्यच होते कारण स्त्री म्हणजे नरकाची खाण, मोहाचे मुलस्थान होती. स्त्रीयांना शिक्षण दिलं तर ती कुमार्गाला लागेल परंतू, अशा कुठल्याही गैरसमजुतींना न जुमानता, न घाबरता महात्मा फुलेंनी व सावित्रीबाई फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले कोणाच्याही विरोधाला न जुमानता निर्भयतेने शाळेत येवून शिकवते ही वार्ता पुण्यात वा-यासारखी सर्वत्र पसरली. धर्म बुडाला, भ्रष्टाचार माजला, कलीयुग आले अशी आरडा-ओरड करत कर्मठ लोकांनी अख्ख पुणे डोक्यावर घेतलं पण तरीही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आपल्या समाजसेवेच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिल्या. शुद्रातीशुद्रांसाठी शाळा काढल्या. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यावेळेला लोकांनी महात्मा फुलेंना खुप त्रास दिला,खुप छळले परंतू, जोतीरावांच्या नसानसातून बंडाची उर्मी उसळत होती. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रध्दा यावर प्रहार करतांना कोणाचीही पर्वा केली नाही. तर त्यांनी मानवतेच्या मुक्तीसाठी क्रांतीचे रणशिंग फुंकले.
त्याकाळात अज्ञान, अस्पृश्यता, बालविवाह, केशवपन, जरठकुमारी विवाह, सतीची प्रथा जोर धरत होत्या तेव्हा त्या बंद केल्या. बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरात स्थापन केले. मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीबाईंना म.फूलेंनी स्वत: शिकवलं, शिक्षिका केलं, मुख्याध्यापिका केलं, त्यांच्याच कार्यामुळे आमच्या माता-भगिनी ग्रा.पं.च्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या. त्यांनी समाजसुधारणे मध्ये  व्यसनमुक्तीलाही महत्व दिले. सन १८७६ ते १८८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून महात्मा फुल्यांनी गोरगरीबांची जनतेची कामे केली. दारूबंदीविरुध्द लढा दिला. लोकांसाठी वाड्या-वस्त्यांवर रस्ते, पाणी, वीज पोहोचविली. ते चांगले बांधकामतंज्ञ सुध्दा होते. त्यांनी कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण, मुंबईचे सी.एस.टी. रेल्वे स्टेशन ची बांधकामे केली पण त्यात कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, असे आदर्श व्यक्तीमत्व त्यांचं होतं.
महात्मा फुलेंचे तत्कालीन काळातील वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये होते तेव्हा टाटा, बिरला, अंबानीचे वार्षिक उत्पन्न वीस हजार रुपये होते. यावरून आपल्याला त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. परंतू त्यांनी मिळकतीचे सर्व पैसे गोर गरींबांच्या, रयतेच्या शिक्षसाठी खर्च करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. चांगल्या प्रकारे साहित्य लेखनही केलं.त्यामध्ये गुलामगिरी, छ.शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा, शेतक-यांचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न इ. साहित्यांमुळे लोकांमधे परिवर्तनाची प्रेरणा निर्माण केली. सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ साली स्थापना करून सत्य शोधण्यास सांगितले. छ. शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र विसरलेला होता. तेंव्हा त्यांची समाधी शोधून पहिली शिवजयंती रायगडावर साजरी करणारे खरे शिवजयंतीचे जनक हे महात्मा फुलेच आहे.
११ मे १८८८ साली जनतेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महात्मा ही पदवी दिली. जोतीराव फुलेंनी सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समानता, जातीय निर्मुलन, धर्म चिकित्सा, आंतरजातीय विवाह अशा विविध सामाजिक कार्यातून आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं. त्यांच्या शाळेतील शिक्षण हे माणूस घडविणारं होतं. म्हणून मुक्ता साळवे नावाच्या मुलींने धर्माची चिकित्सा केली. तान्हूबाई गिरजे ह्या “दिनबंधू” वृत्तपत्राच्या भारतातील पहिल्या महिला ‘संपादक’ होत्या. फातिमाबी शेख ह्या स्त्रीला “मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका” म्हणून मान मिळाला. त्याचप्रमाणे जगामध्ये असे एकच दांपत्य आहे की ज्या दोघांच्या नावाने विदयापीठे आहेत. -१) म. फुले कृषीविदयापीठ, राहूरी २) सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे. ही आमच्यासाठी किती अभिमानास्पद बाब आहे. शिक्षण हे समाजक्रांतीचे, समाजजागृतीचे साधन आहे. शिक्षणाने माणसाचे पशुत्व जाते, माणुसकीचा विकास होतो. माणूस म्हणून जगण्याचे धडे हे शिक्षणातूनच गिरवता येतात. हे महात्मा फुलेंनी कृतीतून आम्हाला दाखविले. त्यांनी आपल्या जीवनात सर्वधर्मसहिष्णूतेला फार महत्व दिलं. कधीही जात-पात-धर्म मानला नाही. शेतक-यांसाठी, कष्टक-यांसाठी, दिनदुबळ्या, गोरगरीब, अठरापगड जातीसाठी, अस्पृष्यांसाठी, बहुजनांसाठी महात्मा फुलेंनी जीवाचं रान केलं. झगडले,झुंजले,झिजले म.फुले! महात्मा फुलेंचा देह झिजला म्हणुन तुमचा-आमचा देह सजला….! आपल्या दृष्टीने तर महात्मा फुले हे आधुनिक भारताचे खरे शिल्पकार आहेत.
शब्दांकन …
युवाव्याख्याते-प्रबोधनकार
मा. शिवश्री. सतिष उखर्डे
Mahatma Jotiba Phule True craftsman SAtish Ukharde
Editorial Title: Mahatma Jotiba Phule True craftsman of modern India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here