महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना होम ग्राउंडवर मोठा धक्का
Radhakrishna Vikhe Patil News : विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटील समर्थकांच्या सत्ताधारी साई जनसेवा पॅनल आणि साई हनुमान पॅनलचा धुव्वा उडवला. (Society Election)
राहता: साईबाबा संस्थान कर्मचारी वर्गाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या साईबाबा संस्थान क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 17 जागा जिंकल्या. विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटील समर्थकांच्या सत्ताधारी साई जनसेवा पॅनल आणि साई हनुमान पॅनलचा धुव्वा उडवला आहे. गणेश साखर कारखाना निवडणुकीनंतर महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत साई जनसेवा, साई हनुमान पॅनल हे विखे पाटील समर्थकांचे होते, तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी परिवर्तन हा स्वतंत्र पॅनल उभा केला होता.परिवर्तन पॅनलने सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.
सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विठ्ठल पवार यांची ओळख आहे. मागील निवडणुकीत पवार यांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी संस्थान कर्मचारी सोसायटीच्या सभासद मतदारांनी विठ्ठल पवार यांना कौल दिला.
या निवडणुकीसाठी 97.50 टक्के मतदान पार पडले होते. सुरूवातीपासूनच परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत टिकवली. सर्व मतदान हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, ज्यात मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान केल्याने परिवर्तनचे सर्व उमेद्वार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विठ्ठल पवार यांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात यांनी देखील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. दरम्यान विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला.
Web Title: Minister Radhakrishna Vikhe Patil hit home ground Society Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study