अकोले: कातळापूर शिवारात महिलेचा खून, सॅनिटरी पॅडवरुन पकडला खुनी
Ahmednagar News: कातळापूर (ता. अकोले) शिवारात गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर: वांबोरी (ता. राहुरी) येथील महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याणी महेश जाधव (वय 25) असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या पायातील चप्पल, पैजन आणि पर्समध्ये आढळून आलेले सॅनिटरी पॅड यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी सदरचा गुन्हा डिटेक्ट केला आहे. कल्याणीचा मारेकरी तिचा पती व भाचा निघाला असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. एलसीबीने या दोघांना वांबोरीतून अटक केली आहे. पती महेश जनार्दन जाधव (वय 31) व भाचा मयुर अशोक साळवे (वय 25) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश वांबोरी ग्रामपंचायतीचा कर्मचारी. त्यांची पत्नी कल्याणी व दोन मुलींसह तो गावातच राहत होता. पत्नीवर त्याचा संशय होता. तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले; पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याला भाचा मयुर साळवे याची साथ मिळाली. त्यांनी कल्याणी हिच्या खुनाचा प्लॅन तयार केला. त्यासाठी कल्याणीला अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरात फिरण्यासाठी नेण्याचा व तेथेच खून करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ते दोघे 3 ऑगस्ट रोजी कल्याणीला घेऊन वांबोरी येथून निघाले आणि काताळापुर येथे पोहचले. निर्जन स्थळ पाहून त्याच ठिकाणी कल्याणीचा गळा आवळून खून करण्यात आला. तिचा मृतदेह तेथेच टाकून ते पसार झाले.
पूर्वनियोजिन प्लॅन प्रमाणे महेश याने पत्नी पांढरीपुल येथून हरवली असल्याची तक्रार सोनई पोलीस ठाण्यात 4 ऑगस्ट रोजी दाखल केली. या मिसिंगचा तपास सोनई पोलीस ठाण्याकडून सुरू होता. तर दुसरीकडे कातळापूर (ता. अकोले) शिवारात एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. सुरूवातीला राजुर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती; पण त्या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न होताच अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबी निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, संतोष खैरे, फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, शिरसेना काळे, रोहिणी जाधव, ताई दराडे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अरूण मोरे, भरत बुधवंत यांचे पथक या गुन्ह्याचा तपासाचे काम करत होते.
या पथकाने मृतदेह आढळलेल्या ठिकाणी भेट दिली असता कल्याणीच्या पर्समध्ये एक सॅनिटरी पॅड आणि पायातील पैजन, चप्पल मिळून आली. त्यावरून गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. सॅनिटरी पॅडवर ‘फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर’. असे लिहलेले होते. पोलिसांनी जिल्हा परिषद गाठून आरोग्य विभागातील अधिकार्यांकडून माहिती घेतली असता हे सॅनिटरी पॅड फक्त अनु.जातीच्या (एससी) ग्रामीण भागातील महिलांकरीताच दिले जाते व याचा पुरवठा महिला व बालविकासामार्फत अंगणवाडी सेविकांना व पुढे अनु. जातीच्या महिलांना केला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अंगणवाडी ताई, आशा सेविका यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर कल्याणी हिचा फोटो व मेसेज व्हायरल केला. तो फोटो पाहून वांबोरी येथून एक फोन एलसीबीच्या अधिकार्यांना गेला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाले.
मयुर एक उच्चशिक्षित तरूण असून तो एअरटेल कंपनीत नेटवर्क सिस्टीमचे राहुरी भागात काम करतो. त्याच्याकडील ज्ञानाचा उपयोग त्याने कल्याणीला संपविण्यासाठी केला; पण त्याचे ज्ञान पोलिसांसमोर टिकले नाही. त्याने खून करतेवेळी अनेक गोष्टींची काळजी घेतली होती. आपण कल्याणीला मारले हे कोणालाच कळणार नाही याची खात्री त्याने मामा महेश याला दिली होती. मात्र, पोलिसांनी अगदी बारकाईने तपास केला, सुताहून स्वर्ग गाठला. साधे एक सॅनिटरी नॅपकीन हाती आले तर पोलिसांनी त्याहुन मयताची ओळख आणि आरोपींचा शोध घेतला. पोलीस अधीक्षक ओला आणि निरीक्षक आहेर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
मयत महिला कल्याणी जाधव असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबी पथकाने वांबोरीतील कल्याणीचे घर गाठले. तिचा पती महेश याच्याकडे चौकशी केली असता कल्याणी 4 ऑगस्टपासून हरवली असल्याची व सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून सखोल आणि बारकाईने तपास सुरू केला. तेव्हा महेश आणि त्याचा भाचा मयुर यांच्यात वारंवार संपर्क असल्याचे दिसून आले. महेश याला पत्नीची चप्पल, पैजण दाखविले असता तो कबूल झाला नाही. पोलिसांनी त्याच्यासह मयूर याला ताब्यात घेतले. त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना खाक्या दाखविला तेव्हा त्यांनी घडलेली घटना कशी केली याची माहिती पोलिसांना दिली.
Web Title: Murder of woman in Katlapur Shiwar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App