Home अकोले अकोले आगाराच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका

अकोले आगाराच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका

राजुर: अकोले तालुक्यातील राजुर परिसरातील चाळीस गाव डांगाण भागातील प्रवाशांचा विचार न करता एस.टी.महामंडळाच्या अकोले आगाराचा मनमानी कारभार सुरु असुन प्रवाशांना सोयीस्कर असलेल्या गाड्या परवडत नसल्याचे कारण दाखवत बंद के ल्या जात आहेत.त्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत असुन त्यांनी प्रवाशांचा विचार करुन गाड्या सुरू कराव्यात अन्यथा राजुर बसस्थानकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राजुर येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

अकोले आगाराची नेहमीच राजुर भागावर वक्रदृष्टी राहिली आहे.जव्हार, ठाणे,मुंबई या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या गाड्या बंद केल्यानंतर गेली चाळीस-पन्नास वर्षांपासून सुरु असलेली संगमनेरहुन रात्री दहा वाजता सुटणारी राजुर बसही आगाराने परवडत नसल्याचे कारण देत अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.पुणे,नाशिक व नगरहुन आपली कामे आटोपून परतणारे चाकरमानी व व्यापारी यांना रात्री दहापर्यंत संगमनेरला पोहचणे शक्य होते.त्यामुळे त्यांना रात्री दहाची संगमनेरहुन सुटणारी राजुर बस सोयीची होती. मात्र ती बंद झाल्याने राजुर भागातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.अचानक गाडी बंद झाल्याने दहा वाजता गाडी आहे असे समजुन संगमनेरला रात्री दहाच्या सुमारास येणाऱ्या प्रवाशांना राजुर बस नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्याचप्रमाणे कोल्हापूर गाडीचा चांगला रिपोर्ट होत असतानाही ती अकोले आगाराने बंद केली. तसेच आगारातील बसेस नेहमीच रस्त्यात नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होतात. अकोले आगाराने संगमनेरहुन रात्री दहा वाजता सुटणारी राजुर बस पुन्हा सुरु करावी, अन्यथा राजुर बसस्थानकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी संघटना व राजुर ग्रामस्थांनी दिला आहे.दरम्यान याबाबत अकोले आगारप्रमुख यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

 अकोले आगार नेहमीच राजुर भागाबाबद उदासीन दिसून येते. संगमनेरहुन सुटणारी रात्री दहाची बस बंद झाल्याने व्यापारी व चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ती बस पुन्हा सुरु करावी,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. -गोकुळ कानकाटे,उपसरपंच ग्रा.पं.राजुर.

अकोले आगाराच्या मनमानी कारभाराला प्रवासी वैतागले असून त्यांच्या भावना तीव्र आहेत. अकोले आगाराने यात तातडीने सुधारणा करुन राजुरला प्राधान्य द्यावे. -संतोष बनसोडे, माजी सरपंच ग्रा.पं.राजुर.

Website Title: Normal Passenger Traffic Of Akole Agra Has Been Hit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here