मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण भरले;नदीपात्रात ३०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरू
अकोले: संगमनेर-अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून पाणी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारात वाहत असल्याने मुळा नदी वाहती झाली आहे.
मुळा नदीच्या पाणलोटात जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे मुळा नदीवरील आंबित हे पहिले धरण पूर्ण क्षमतेने भरले. हे धरण भरल्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. ६०० दलघफु क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आठवडयापासून आवक सुरु होती. या धरणात पाणी साचल्याने कोतुळचा पूल बुधवारी पुन्हा पाण्याखाली गेला आहे. मुळा खोऱ्यात पावसाने उघडीप घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मंदावली होती. मात्र शुक्रवारी दिवसभर चांगला पासून झाल्याने धरण आज शनिवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. आणि पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले.
सध्या पिंपळगाव खांड धरणातून ३०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोटात पवसाने पुन्हा एकदा जोर दाखविला तर मुळेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्याने, पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाच ते सहा दिवसात मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु होणार आहे.
Website Title: Pimpalgaon Dam Dam Full Of River Mula