खड्डा चुकवताना रिक्षाला अपघात; आई सह आठ महिन्याच्या बालकाचा करून अंत
Parbhani Accident : रस्त्यावरील खड्डा चुकविताना रिक्षा पलटी झाल्याने आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परभणीच्या राहटी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील रस्त्यांनी आता आणखीन दोन जणांचे जीव घेतले आहेत. पद्मिनी शिंदे व वैभव शिंदे अस मृत आई आणि मुलाचं नाव आहे. परभणी – वसमत मार्गावरील रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे समजते.
मंगळवारी पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील मुंजाजी शिंदे आपली पत्नी पद्मिनी शिंदे व आठ महिन्याचा चिमुरडा वैभव शिंदे यांच्या सोबत रिक्षात बसून देव दर्शनासाठी त्रिधारा येथे निघाले होते. मात्र रस्त्यातील खड्डे चुकवत असताना तोल जाऊन रिक्षा पलटी झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात माय लेकरचा जागीच मृत्यू झाला. तर मुंजाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कासव गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातील धीम्या सुरू असलेल्या रस्त्यांचे काम आणखीन किती जीव घेणार आहे असा प्रश्न सामान्य परभणीकरांना पडु लागला आहे.
Web Title : Parbhani Rickshaw accident while passing the pit; Eight-month-old baby dies with mother