Home अहमदनगर अहमदनगर: कारखान्याचे माजी संचालक व मुख्याध्याकाच्या घरावर धाडसी दरोडा, लाखो लंपास

अहमदनगर: कारखान्याचे माजी संचालक व मुख्याध्याकाच्या घरावर धाडसी दरोडा, लाखो लंपास

Rahuri Theft robbery on the house of the former director and headmaster

Ahmednagar Rahuri Theft | राहुरी: तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड  येथील डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक व केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द येथील माजी मुख्याध्यापक रमेश नानासाहेब वारुळे यांच्या घरावर चोरट्यांनी धाडसी दरोडा ( robbery) टाकून 12 तोळे सोने व 25 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री (बुधवारी रात्री) घडली.  या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक रमेश नानासाहेब वारुळे हे ब्राह्मणगाव भांड येथे बेलापूर लाख रस्त्यालगत असणार्‍या बंगल्यामध्ये राहत आहे. बुधवारी रात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात १०  ते १२ चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये घराचे दार तोडून प्रवेश केला. यावेळी घरामध्ये वारुळे यांच्या पत्नी, मोठी भाऊजी व वरच्या मजल्यावर असणाऱ्या बेडरूममध्ये मुलगा व सून हे चारजण होते. तर वारुळे हे आपल्या बंधू समवेत शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते.

घरामध्ये प्रवेश करताच बहुदा गुंगीचा स्प्रे मारला असल्याची शक्यता आहे. यामुळे महिलांना गुंगी आल्याने त्या झोपूनच राहिल्या होत्या. याचा फायदा घेऊन या चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली व हाताला लागेल तो ऐवज चोरून नेला.  

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरातील नागरिक देखील आपल्या बरोबर लाठ्या-काठ्या कुर्‍हाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट देऊन माहिती घेतली व चोरट्यांचा माग काढण्यासंदर्भात पोलिसांना सूचना केल्या.

या घटनेमुळे  परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रमेश वारूळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Rahuri Theft robbery on the house of the former director and headmaster

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here