Theft: वसुली अधिकार्यानेच मारला सोन्यावर डल्ला, ११४ तोळे सोने लंपास
बेल्हे: बेल्हे (ता. जुन्नर) येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 114 तोळे सोन्यावर सोसायटीच्याच वसुली अधिकार्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विकास शांताराम खिलारी (वय 41) असे कर्मचार्याचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी त्यास अटक केली आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोने चोरी (Theft) केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लार्कचे काम करणारे कर्मचारी विकास शांताराम खिल्लारी (रा. बेल्हे) यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर बंद करून या सोन्याची चोरी (Theft ) केली.
लॉकरमध्ये अक्षय वसंत जगताप यांनी तारण ठेवलेले 27 तोळे 780 मिली ग्रॅम, महेंद्र बबन जगताप यांचे 5 तोळे 448 मिली ग्रॅम, हारून बाबुभाई बेपारी यांचे 5 तोळे 998 मिली ग्रॅम, राहुल वसंत जगताप यांचे 4 तोळे 500 मिली ग्रॅम, जाफर अहमद पठाण यांचे 11 तोळे 240 मिली ग्रॅम, हारून बाबू भाई बेपारी यांचे 15 तोळे 599 मिली ग्रॅम, सद्दाम रफिक बेपारी यांचे 8 तोळे 815 मिली ग्रॅम, सुनंदा नामदेव नलावडे यांचे 14 तोळे 34 मिली व 11 तोळे 104 ग्रॅम वजनाचे सोने दागिने असे एकूण 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 114 तोळे सोन्याची चोरी केली.
याबाबत शाखा व्यवस्थापक विनोद दत्तात्रेय महाडिक यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वसुली अधिकारी विकास खिलारी याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. वसुली अधिकार्याकडे लॉकरच्या चाव्या आल्या कशा? त्याला अजून कोणी साथीदार आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे. अधिक तपास आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहे.
Web Title: recovery officer himself theft the gold