संगमनेर तालुक्यात या २२ गावांना मिळणार स्वतंत्र नवीन तलाठी, पदांची नियुक्ती
Sangamner News: संगमनेर तालुक्यातील नवनिर्मित 22 तलाठी आणि 4 मंडलाधिकारी यांची नव्याने वाढीव पदांची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली.
संगमनेर : महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्याकडील नमूद शासन निर्णयाने राज्यात वाढीव तलाठ्यांसह सहा गावांमध्ये एक महसूल मंडलाधिकारी या तत्त्वाप्रमाणे संगमनेर तालुक्यातील नवनिर्मित 22 तलाठी आणि 4 मंडलाधिकारी यांची नव्याने वाढीव पदांची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली.
संगमनेर तालुका सर्वात मोठा प्रगतिशील तालुका म्हणून ओळखला जात आहे. यामध्ये 174 महसुली गावांचा समावेश आहे. तालुक्यातील काही गावे पाच हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावांचा यामध्ये समावेश आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने तालुका हा खूप लांबवर पसरलेला आहे तालुक्यासाठी यापूर्वी तलाठ्यांची (सजा) मंजूर संख्या फक्त 61 होती ती आता नव्याने 22 वाढवून असे एकूण 83 तलाठी झालेले आहेत.
तर पुर्वी मंडळधिकारी फक्त दहाच होते तर आता नव्याने चार वाढून ती संख्या 14 झाली आहे. या सर्व नवीन तलाठी व मंडलाधिकारी यांच्या कार्यालयाला जोडली गेलेली तालुक्यातील गावे ही तितकीच गुंतागुंतीची झाली आहेत.पूर्वी मंडलाधिकारी कार्यालय हे काही गावांतील लोकांच्या सोयीनुसार होते तर काहींच्या अडचणीचे होते परंतु आता पूर्वी जुन्या मंडलात असलेली गावे ही तोडली असून ते आता नवनियुक्त झालेल्या चार महसुली मंडलांत विभागणी झाल्याने नव्या जुन्या गावांचा मेळ घालण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केलेला आहे.
नवीन तलाठी (सजा) गावे:
नवीन तलाठी (सजा) झालेली 22 गावे पुढीलप्रमाणे-गुंजाळवाडी, वेल्हाळे, चिकणी, सावरचोळ, निमज, झोळे, सावरगावतळ, औरंगपूर, मालुंजे, पळसखेडे, पारेगाव खुर्द, पोखरी हवेली, वनकुटे, सारोळे पठार, खंदरमाळवाडी, जांबुत बुद्रुक, बिरेवाडी, खांबे, ओझर बुद्रुक, कोल्हेवाडी, नांदुरीदुमाला, पिंपळगाव कोंझिरा, या 22 गावांचा नव्याने तलाठी (सजा) म्हणून समाविष्ट झालेला आहे.
सर्वाधिक 174 गावे असलेल्या संगमनेर तालुक्यासाठी 83 तलाठी पदांची आवश्यकता असून यामध्ये 45 तलाठीच कार्यरत असून हे चालवण्याकरिता नविन 38 तलाठ्यांची आवश्यकता आहे. परंतु 45 तलाठी यांच्याकडेच बाकीच्या गावांचा अतिरिक्त चार्ज देऊन हे सर्व कसरतीचे काम नूतन तहसीलदार यांना करावे लागत आहे. यामध्ये तालुक्यातील तलाठी कार्यालयीन कामकाजाबाबत सर्वसामान्य शेतकरी व हातमजूर यांची मोठी कुंचबना होताना दिसत आहे. तसेच 4 महसुली मंडलातील पदे रिक्त असल्याने इथेही अतिरिक्त चार्ज देऊन कामकाज चालू आहे. एकूणच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ येथील पदांची संख्या वाढवून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा संगमनेरकरांना आहे.
Web Title: Sangamner 22 villages will get independent new Talathi
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App