Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीदुमाला येथे गॅसचा स्फोट होऊन आग (Fire) लागून अख्खे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दिनांक २ जुन रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने काही वेळातच होत्याचे नव्हते झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत धावजी भुतांबरे हे साकुर येथील रहिवासी असुन ते शेतजमीन वाटयाने करण्यासाठी आंबीदुमाला येथील विकास नरवडे यांच्याकडे आलेले आहेत व त्यांची शेती करुन उदरनिर्वाह करत आहेत. अचानक गॅसचा स्फोट होऊन त्यांच्या राहत्या छपराच्या घराला आग लागली या आगीत त्यांचे संपुर्ण संसार उपयोगी साहित्य, दुचाकी,कागदपत्रे,सोने जळुन खाक झाले. त्यावेळी भुतांबरे हे शेतात काम करत होते.व लहान मुले व आई वडील ऊन असल्याने झाडाच्या सावलीत बसले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कुणालाही काहीही झाले नाही.
भुतांबरे हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपले गांव सोडून दुसऱ्या गावात आले होते त्यात ही घटना घडल्याने आता त्यांच्याकडे फक्त अंगावरील कपडे शिल्लक आहेत . या घटनेने भुतांबरे यांचे होत्याचे नव्हते झाल्याने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Sangamner taluka, a gas tank exploded in a plateau area fire