संगमनेर तालुक्यातील पठारभाग हादरला: एकाच रात्रीत आठ घरे फोडली
संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील म्हसवंडी व आंबीदुमाला या दोन्ही गावात चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. मंगळवार ता. १४ डिसेंबर रोजी पहाटे आठ घरे फोडली असून मोठ्याप्रमाणात ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पोलीसांनी ठसेतज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले होते.
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकुळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, रविंद्र उध्दव इथापे, बळीराम कारभारी बोडके, गुलाब गोविंद बोडके, अशोक कारभारी बोडके, बाळासाहेब कारभारी बोडके या सर्वांची घरे फोडून मोठा ऐवज चोरून पोबारा केला आहे त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी आंबीदुमाला येथील सुमन रंगनाथ जाधव यांचेही घर फोडून दागिने चोरून पोबारा केला आहे.
सकाळी घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस आधिकारी राहूल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांनी फोडलेल्या घरांची पाहणी केली यावेळी चोरट्यांनी घरातील सामानांची उचकापाचक करत कपडे फेकून दिली होती त्यानंतर ठसेतज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान या दोन्ही गावात चोरट्यांनी धुमाकुळ घालत घरफोड्या केल्याने ग्रामस्थ चांगलेच हादरले आहे. या प्रकरणी शांताराम रामू बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत हे करत आहे.
Web Title: Sangamner Theft Eight houses were blown up in one night