महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात 20 हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची घटना.
कोपरगाव | Kopargaon: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील ही घटना असल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाकडून धडक कारवाया सुरुच असून नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात कारवाईची धडक मोहीम सुरूच आहे.
एकीकडे महसूल मंत्री विखे पाटील यांनी नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात राज्यातील वाळू डेपो सुरु करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना एक ब्रास वाळू सहाशे रुपयांत मिळत आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही वाळू तस्करी जोरात सुरु असल्याचे या घटनेवरुन अधोरेखित झाले आहे. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतलं आहे. वाळूची गाडी सोडण्यासाठी एका खाजगी पंटरमार्फत ही लाच स्वीकारत असताना बोरुडे यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. एकीकडे महसूलमंत्री नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून वाळू तस्करीला लगाम लावण्याचा दावा करत असताना त्यांच्याच जिल्ह्यात तहसीलदार वाळू तस्करांकडून कारवाई टाळण्यासाठी हप्ते घेत असल्याचं उघड झालं आहे.
यामधील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून वाळू वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरता लाच घेणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदारासह पंटरला शनिवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारावर कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडून देण्यासाठी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी 20 हजारांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम पंटरकडे देण्यास सांगितले. दरम्यान एसीबीने सापळा रचून खासगी इसम गुरमितसिंग दडियल याला 20 हजारांची लाच स्वीकारताना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
याबाबत 17 मे रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली. लाच मागितल्याचे निष्पत्र झाल्यानंतर एसीबीने शनिवारी कोपरगांव तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात बोरुडे आणि दडियल अडकले. 20 हजारांची लाच घेताना बोरूडे आणि दडियाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
Web Title: Tehsildar in ACB’s net while accepting bribe of 20 thousand in revenue minister’s district
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App