Breaking News | Weather Rain Update: सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी.
अहमदनगर: मंगळवारी सांयकाळी नगर शहर, एमआयडीसी आणि उपनगरात अचानक आभाळ भरून येत पावसच्या सरी कोसळल्या. यावेळी जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट देखील होता. नगर तालुक्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त असून अवकाळीमुळे पुन्हा सोंगणीसाठी आलेल्या गहू, हरभरा पिकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे बळीराजाच्या समोरील अडचणी वाढणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून टप्प्या टप्प्याने अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा पावसाने हात वर केल्याने रब्बी हंगामातील पिकांना दणका बसलेला असताना आता पुन्हा अवकाळी यामुळे हंगामात प्रयत्न करून हाता तोंडाशी आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या दरम्यान अवकाळी पाऊस बरसत असतो, असे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा साधारण आठ दिवस आधीच अवकाळीने हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी शेतात सांगणी करून ठेवलेला गह आणि हरभरा पिकांसह सोंगणीसाठी आलेले पीक आहे. यासह कांदा पिकासह भाजीपाला पिके असून त्यांना अवकाळीमुळे चांगलाच दणका बसण्याची शक्यता आहे. नगरमध्ये काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आभाळ भरून आले. त्यानंतर अचानक सोसाट्याचा वारा सुरू होवून साधारण दहा मिनीट जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. यावेळी ढगांचा गडगडाट सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा असतांना अचानक वातावरण दमट होवून पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. मंगळवारी नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती तयार झाली होती. तसेच काही ठिकाणी भूरभूर पावसाला सुरूवात झाली होती. रात्री उशीरापर्यंत ही स्थिती कायम होती.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशातील हवामान पाहता, २६ फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. २५ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Web Title: Unseasonal rain in the city
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study