अकोलेत ढगफुटीसदृश अवकाळी पावसाचा धुमाकूळ, ग्रामस्थ तहसील दारी
Akole rain news: वीरगाव येथे ढगफुटीसदृश्य जोरदार पावसाने घरे उघड्यावर पडली.
अकोले : गेले दोन दिवस तालुक्यात सर्वदूर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, बुधवार व गुरुवारी ढगफुटीसदृश्य जोरदार पावसाने बॅटिंग केली. गुरुवारी दुपारी अकोले शहर परिसरासह निळवंडे, देवठाण, विरगाव, गणोरे, कळस, इंदोरी, औरंगपूर येथे जोरदार पाऊस कोसळला. काही मिनिटांत परिसर जलमय झाला होता तर काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात व शेतशिवारात तुडुंब पाणी साठले होते. तर ओढेनाले पूररेषा ओलांडून वाहू लागले होते.
पश्चिम घाटमाथ्यावर भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर कमी आहे. मात्र, निळवंडे धरण परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर अधिक आहे.
तालुक्यातील देवठाण विरगाव गणोरे भागात गुरुवारी दुपारी जवळपास सव्वा ते दीड तास ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आणि अवघ्या काही मिनिटांत डोंगरावरून असंख्य धबधबे प्रवाहित झाले होते.
या वर्षी घाटघर येथे आतापर्यंत ७१०२ तर रतनवाडी येथे ६३२६ मिलीमीटर पाऊस कोसळला, गतवर्षी आजच्या तारखेला घाटघर येथे ४५५२ तर रतनवाडी येथे ४१७१ मिलीमीटर पाऊस झाला होतो. गतवर्षीपेक्षा यंदा तीन हजार मिलिमीटर अधिक पाऊस पडला.
अकोले तालुक्यात आजही शुक्रवारी जोरदार हजेरी लावत पावसाची बॅटिंग सुरु आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे.
अकोले तालुक्यातील वीरगाव येथे ढगफुटीसदृश्य जोरदार पावसाने घरे उघड्यावर पडली आहे. घरे, कपडे, धान्य वाहून गेल्याने काही कुटुंबे रस्त्यावर आली आहे. तहसील प्रशासनास कळविले असता त्यांनी तत्काळ मदत न दिल्याने वीरगाव ग्रामस्थ तहसीलदार दारी आपल्या समस्या घेऊन ठाकले होते. यावेळी अमृतसागर दुध संघाचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी तहसीलदार यांना माहिती दिली. यावेळी तहसीलदार व वाकचौरे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी अकोले तालुक्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी मध्यस्थी करत प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसाने वीरगाव गावातील बारवी भागातील आदिवासी कुटुंबातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र प्रशासन मदत करण्यास असमर्थ ठरल्याने ग्रामस्थांनी मोर्चा तहसीलदार दारी वळविला. नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी घरे व मदतीची मागणी केली. तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली.
या ढगफूटीची माहिती रावसाहेब वाकचौरे यांनी तहसीलदार थेटे यांना भ्रमणदूरध्वनीवरुन देऊन घरकुलांमध्ये पाणी घुसलेल्या आदिवासींची व्यवस्था करण्याची मागणी केली. व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. या दरम्यान वाकचौरे व तहसीलदार थेटे या दोघांमध्ये बोलण्याच्या ओघात हमरीतुमरी झाली. यानंतर वीरगाव ग्रामस्थ तातडीने अकोलेत तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनासाठी उपस्थित झाले. यावेळी तहसीलदार यांच्या दालनातच त्यांना रावसाहेब वाकचौरे व वीरगाव येथील आदिवासी ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला.
यावेळी सहा.पोलीस निरीक्षक घुगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार व रावसाहेब वाकचौरे यांना शांत केले. आदिवासी समाजाच्या प्रश्नी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन घुगे यांनी यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना दिले. नुकसानीची पाहणी करुन महसूल प्रशासनाच्या सहाय्याने योग्य ती कार्यवाही करुन संकटग्रस्त वीरगाव ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर हा तणाव निवळला.
Web Title: unseasonal rain like cloudburst in Akole, village Tehsil Dari