डांबरी रस्त्यावर डोकं आपटून महिला ठार, दुचाकीवर तोंडाला स्कार्फ बांधणं पडलं महागात
दुचाकीवर पाठीमागे बसून तोंडावर स्कार्फ बांधण्याचा प्रयत्न करणारी महिला तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने (Accident) जागीच ठार झाल्याची घटना.
कोल्हापूर: धावत्या दुचाकीवर पाठीमागे बसून तोंडावर स्कार्फ बांधण्याचा प्रयत्न करणारी महिला तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने (Accident) जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यातील राशिवडे-चांदे दरम्यान घाटात वळणावर बुधवारी घडली.
कल्पना नारायण कुरणे (वय ४२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना कुरणे यांच्या चांदे येथील पुतणीच्या घरी वास्तुशांती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी काल दुपारी नातेवाइकांसोबत दुचाकीवरून जात होत्या.
राधानगरीत तालुक्यातील राशिवडे मार्गावरून पुढे चांदे गावाकडे दुचाकी वेगाने जात होती. उन्हाचा तडाखा वाढल्याने कुरणे चेहऱ्यावर कापडी स्कार्फ बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याचवेळी घाटात वळणावर त्यांचा तोल गेल्याने काही कळण्यापूर्वीच त्या डांबरी रस्त्यावर कोसळल्या.
डांबरी रस्त्यावर त्यांचे डोके जोरात आपटल्याने गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. या मार्गावर राशिवडे व चांदे या दोन्हीकडील घाटांना तीव्र वळणे आहेत.
Web Title: a woman was killed after hitting her head on the asphalt road Bike Accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App