विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू
Mother's Death By Electric Shock
अकोले : शहरापासून जवळच असणाऱ्या गर्दणीच्या शिवारात शेतात पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अकोले येथील मॉर्डन हायस्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असलेल्या दिलीप झोळेकर यांच्या पत्नी संगीता (वय ४० ) व त्यांचा मुलगा अविष्कार (वय १७) हे त्यांच्या शेतात टोमॅटोला पाणी भरत असताना ही घटना घडली. झोळेकर हे त्यांना ४ वाजेपासून फोन करत होते; पण ते फोन उचलत नाही म्हणून त्यांनी शेजारीच असणाऱ्या लहानू सुखदेव पाबळे यांना शेतात जाण्यास सांगितले. त्यानंतर पाबळे हे तिथे गेले, तर ते मायलेक शेतात पाण्याने वाहत असलेल्या पाटात पडलेले असल्याचे लक्षात आले. त्यांनी गर्दणीचे पोलीस पाटील संतोष नामदेव अभंग यांना रात्री ७.४० वाजता कळविले. त्यानंतर अभंग यांनी अकोले पोलिसांत खबर दिली. पोलीस कॉन्स्टेबल भोसले तिथे आले. त्यानंतर मायलेकांना ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तेव्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक,मित्र, परिवार, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मयत संगीता झोळेकर यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याने सर्वांची मने हेलावून गेली. यावेळी त्या नातेवाईकांनी पती दिलीप झोळेकर यांच्यावरही आरोप केल्याने वातावरण काहीकाळ तंग झाले होते. मयत संगीता या अकोले महाविद्यालयातील प्राध्यापक गणपत नवले यांच्या भगिनी होत. अकोले पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
Website Title : Mother’s Death By Electric Shock