Home अहमदनगर अहमदनगर व शिर्डीसाठी अंदाजे किती टक्के मतदान

अहमदनगर व शिर्डीसाठी अंदाजे किती टक्के मतदान

Breaking News | Ahmednagar Lok Sabha Election: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ६१ टक्के तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ६२ टक्के मतदान.

Approximate voting percentage for Ahmednagar and Shirdi lok sabha Election

नगर: अहमदनगर व शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी शांततेत मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ६१ टक्के तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

दरम्यान, पाच वाजेपर्यंत अहमदनगर मतदारसंघात ५३.३४ टक्के तर शिर्डी मतदारसंघात ५५.२७ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही मतदारसंघांतील ४५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे. मतमोजणी नगर येथील वखार महामंडळाच्या गोदामात ४ जून रोजी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर मतदारसंघात २५ तर शिर्डी मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील ३ हजार ७३४ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मॉकपोल घेण्यात आले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडली. गेल्या महिनाभर उन्हाचा तडागा सुरु होता. गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी उन्हाची तीव्रता कमी होती. त्यामुळे सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होती. त्यानंतर दुपारी गर्दी ओसरली होती.

अहमदनगर मतदारसंघात १९ लाख ८१ हजार ८६६ मतदारसंख्या आहे. दुपारी ३ वाजेपर्यत यापैकी ८ लाख २६ हजार ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहमदनगर मतदारसंघातील १० लाख ५७ हजार १०२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ५ लाख ७९ हजार २९२ पुरुष तर ४ लाख ७७ हजार ७६६ महिला तर ४४ इतर मतदारांचा समावेश आहे. सरासरी ५३.३४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

शिर्डी मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ९ लाख २७ हजार ३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी या मतदारसंघात ५५.२७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५७ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल शिर्डी, नेवासा ५६ तर अकोलेत ५३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेनंतरही मतदान प्रक्रिया सुरु होती. दोन्ही मतदारसंघांत सरासरी ६० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी अहमदनगर एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ३ हजार ७३४ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे गोदामात जमा केली जाणार आहेत. त्यासाठी १२ विधानसभा मतदारसंघांतून रात्री उशीरा मतदान यंत्रे अहमदनगरकडे पोलिस बंदोबस्तात दाखल होत आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत मतदान यंत्रे गोदामात सील होण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली.

Web Title: Approximate voting percentage for Ahmednagar and Shirdi lok sabha Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here