अहमदनगर: चार गावठी कट्टे व १६ जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद
Ahmednagar: Arrested carrying four Gavathi Kattes and 16 live cartridges.
अहमदनगर: मध्यप्रदेश येथून नगर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले चार गावठी कट्टे व १६ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
रितेंद्र सिंह बरनाला (वय 22 रा. उमरती, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्याच्याकडून चार कट्टे, 16 काडतुसे असा एक लाख 31 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून रितेंद्र सिंह बरनाला विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्याकडून माहिती मिळाली की, एक व्यक्ती गावठी कट्टे व जीवंत काडतसे विक्री करण्यासाठी नगर शहरातील तारकपूर बसस्थानक परिसरात येणार आहे. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार वाघ, संजय खंडागळे, देवेंद्र शेलार, विशाल दळवी, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने सापळा लावून प्रवासी म्हणून बसची वाट पाहत आहेत, असा बनाव केला.
एक संशयित व्यक्ती पाठीवर काळ्या रंगाची सॅक घेऊन येताना आढळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने रितेंद्र सिंह बरनाला (वय 22 रा. उमरती, जिल्हा बडवानी, मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीमध्ये चार गावठी कट्टे व 16 जीवंत काडतुसे असा एकूण एक लाख 31 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करत तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
Web Title: Arrested carrying four Gavathi Kattes and 16 live cartridges