प्राचार्य मनोहर लेंडे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न, त्यांचे कार्य आदर्शवंत- अॅड. एम.एन. देशमुख
Sarvoday Vidya Mandir Rajur completion ceremony of Principal Manohar Lende: प्राचार्य मनोहर लेंडे यांचे कार्य आदर्शवंत.
राजुर: पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचे सामर्थ्य देतात. त्यासाठी ध्येय निश्चित करा. जीवनात काम करत असताना कष्टाने प्रेरीत व्हा. कारण ध्येयापयत पोहचण्यासाठी कष्टाचे इंधन गरजेचे असते. प्राचार्य मनोहर लेंडे यांनी आपल्या काळात केलेले शैक्षणिक कार्य आदर्शवंत होते, असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख यांनी केले. गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथील प्राचार्य मनोहर लेंडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी अॅड. मनोहरराव देशमुख व्यासपिठावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन हे होते.
याप्रसंगी सत्कारमुर्ती प्राचार्य मनोहर लेंडे, सुनिता लेंडे, आ. डॉ. किरण लहामटे, सरपंच पुष्पाताई निगळे, संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे, संचालक मारूती मुठे, नंदकिशोर बेल्हेकर, चिमणराव देशमुख, विजय पवार,एस. टी. येलमामे, श्रीराम पन्हाळे, रामजी काठे, विलास पाबळकर, उपप्राचार्य बादशहा ताजण, माजी प्राचार्य विलास नवले, प्राचार्य बाबासाहेब देशमुख, सुनिल धुमाळ, लहानु पर्बत, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे, यां सह सत्यनिकेतन परिवारातील सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नांदुरखंदारमाळचे ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना अँड. देशमुख यांनी ज्या कार्यात संपूर्ण श्रद्धा ओतली जाते, जे कार्य मनापासून केले जाते त्या कार्याचे फळ निश्चित मिळते. शक्य तेव्हढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काहीच रहात नाही. त्यासाठी कामात सतत व्यस्त असावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
उपप्राचार्य बादशाह ताजणे यांनी केले. अध्यापक संतराम बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार पर्यवेक्षक मधुकर मोखरे यांनी मानले.
प्राचार्य मनोहर लेंडे सन्मानपत्र:
समता व बंधुभावाचा वसा घेणारे, स्वतःच्या कर्मावर निष्ठा असणारे व ‘बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।। या तुकोक्तीवर श्रद्धा ठेवणारे आदरणीय श्री.मनोहर दत्तात्रय लेंडे यांना विद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र.
मनोहरराव आपण सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेवून आज सर्वसामान्यांच्या मनात आपल्या कार्यशैलीतून आदर्श स्थान निर्माण केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, पुन्हा त्यात आपण ज्याठिकाणीं जन्म घेतला ते खंदरमाळ अत्यंत दुष्काळी. आई चांगुणाबाई आणि वडील दत्तात्रय यांचे पोटी सहावे अपत्य म्हणून आपण जन्म घेतला. निसर्गाच्या पाण्यावर आधारित शेती करत करत आई-वडील प्रपंच्याचा गाडा ओढत…. असत, त्यातही वेळेवर पाऊस येत नसल्याने मोलमजुरीला जाऊन आई-वडिलांनी आपणास शिक्षण दिले. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असताना देखील आपण शिक्षणाची कास सोडली नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंदरमाळ येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी प्रवास करून घारगाव ‘भारत हायस्कूलला’ जावून पूर्ण केले. रोज शाळेसाठी पायी जाणे, शेतीत काम करणे, मजुरीने जाणे हे आपणास लहान वय असतापासून करावे लागल्या कारणाने शारीरिक व मानसिक क्षमता चांगलीच सक्षम झाली. प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे साहजिकच होते.
नापास झाल्याने दोन वर्षे शिक्षणाच्या प्रवाहा पासून दूर राहावे लागले, पण तुमच्या ठिकाणी असलेली जिद्द आणि ध्येयासक्त वृत्ती कधीच थांबली नाही. त्याचीच फलश्रुती म्हणजे आज आपण प्राचार्य या पदावरून सेवा निवृत्त होत आहात. विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण सहयाद्री उच्च माध्य. विद्यालय, संगमनेर येथून पूर्ण केले. ज्या गणित विषयात आपण नापास झालात त्याच विषयात बीएस्सी पदवी न्यू आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज अहमदनगर येथून प्राप्त केली.
गोखले एज्यू सोसायटी बी.एड. कॉलेज या ठिकाणी आपण बी. एड. व्यावसायिक पदवी प्राप्त करून घेतली शिक्षकाची नोकरी मिळावी या उद्देशाने मधल्या काळात आपण अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आणि 10/08/1995 रोजी आपण सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विद्या मंदीर, कातळापूर याठिकाणी रुजू झालात. दरम्यानच्या काळात गणित विषयाचे नामवंत आणि
विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नाव लौकिकास आलात. गणित विषयाच्या निकालाची आपल्या कामापासून उज्ज्वल परंपरा तयार झाली. हसत खेळत गणितीक्रिया विद्यार्थ्याच्या गळी उतरविणारे यशस्वी शिक्षक ठरतात.
सन 2006 रोजी जिथे आपली नियुक्ती झाली त्याच ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नत झालात. काम करण्याची शक्ती लक्षात घेवून संस्थेने आपणास खिरविरे येथे मुख्याध्यापक म्हणून बदलीने पाठविले. खिरविरे येथे ज्युनियर कॉलेजच्या उभारणीत आपला मोलाचा सहभाग आहे. हे याठिकाणी प्रकर्षानि सांगावेसे वाटते. सहा वर्षाच्या मुख्याध्यापकाचा कार्यकाल लक्षात घेता सत्यनिकेतन संस्थेचे राजूर युनिट आपण सक्षमपणे चालू शकता याचा विश्वास संस्था पदाधिका-यांच्या मनात, आपण निर्माण केला आणि जून 2013 पासून गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदीर माध्य व उच्च माध्य विद्यालयात प्राचार्य म्हणून बदली नियुक्त झालात आणि विद्यालयाच्या उत्थानासाठी आजपावेतो काम करत आहात याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. प्रभावी कामकाजाने परिसरात ठसा उमटविला. सेवा काळात विविध सामाजिक, शैक्षणिक काम करून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला..
मी आजन्म विद्यार्थी आहे हे सिद्ध करत सेवा काळात एम. एड ही पदवी धारण केली, पत्रकारीता कोर्स पूर्ण केला व शाळा व्यवस्थापन पदविकाही घेतली 2003 ते 2006 या कालखंडात अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे संचालक म्हणून काम केले. ‘अकोले ता. मुख्याध्यापक संघ अकोले यांचे पाच वर्षापासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. सन 2018 पासून ‘मानवाधिकार संघटनेत काम करीत आहात. तुमच्या कार्याची दखल घेत
आज राष्ट्रीय उपसचिव या पदावर काम करीत आहात. आपणास भारतीय समाज विकास अकादमी मुंबई यांच्या कडून राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार 2012, मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांचे कडून राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्कार 2022 या पुरस्काराने आपणास सन्मानीत करण्यात आले.
आज व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हे सन्मानपत्र आपणास प्रदान करीत असताना मनस्वी आनंद होत आहे.
Web Title: completion ceremony of Principal Manohar Lende was completed
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App