डॉक्टर पतीकडून पत्नीचा शारीरिक मानसिक छळ
पैठण | Crime News: हाँस्पिटल उभे करण्यासाठी माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये. नाहीतर घटस्फोट दे अशी मागणी करत डॉक्टर पतीने शारीरिक मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेने दिली असून यावरून पैठण पोलिसांनी याबाबत डॉ. पतीसह सासू, सासरे व दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विवाहिता श्रध्दा प्रद्युम्न अंबेकर-काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिशोर (ता.कन्नड) येथील डॉ. प्रद्युम्न सुनील अंबेकर यांच्यासोबत त्यांचे दि. ६ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले. दोन महिन्यानंतर कन्नड येथील एका खासगी दवाखान्यात काम करत असताना डॉ. पतीने विवाहितेचा छळ सुरू केला.
सासू अलका सुनील अंबेकर, सासरे सुनील रंगनाथ अंबेकर व दिर अनिरुद्ध सुनील अंबेकर यांनी मारहाण करत तु नोकरी करत नाही. काही कमवत नाही’ असे म्हणत मारहाण सुरू केली. एवढेच नव्हे तर हाँस्पिटलसाठी जागा शोधायची आहे. असे सांगत वडिलांना बोलावून घेतले. व त्यांच्यासोबत मला माहेरी पाठवून दिले. व नंतर घेण्यासाठी आलेच नाहीत. असे या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान माहेरच्या मंडळींनी कसेबसे विवाहितेला पुन्हा सासरी नेऊन सोडले. नंतर डॉ. प्रद्युम्न अंबेकर यांनी फुलंब्री येथे हाँस्पिटल टाकून किरायाच्या घरात राहू लागले. तथापि तेथे येऊन सासू, सासरे व दिर यांनी जाच केल्यामुळे अनेकदा माहेरी यावे लागले. २३ जुलै २०१९ मध्ये मुलगा झाल्यावर ३ महिन्यांनी नातेवाईकांनी तडजोड करून विवाहिता पुन्हा नांदायला आली. मात्र मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच पती डॉ. प्रद्युम्न अंबेकर यांनी दि. २३ जुलै २०२० रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यानंतर विवाहितेला परत माहेरी हाकलून दिले. विशेष म्हणजे तब्बल ६ महिन्यानंतर सासरच्यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात विवाहितेविरुद्ध पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार विवाहितेवर गुन्हा दाखल झाला. विवाहितेने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. असेही विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी वरील चार आरोपींविरुद्ध भादवी ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
Web Title: Crime News Physical and mental abuse of wife by doctor husband