पोलिस अधिकार्यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती जाळ्यात
Breaking News | Pune Bribe Case: पोलीस अधिकाऱ्यासाठी एक लाख रुपयांची लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले.
पुणे : फसवणूक प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अर्जाच्या चौकशी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 25 हजार रुपये स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय करणाऱ्या खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.21) कात्रज परिसरातील सुखसागर नगर येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे केली.
तुषार शीतल बनकर (वय-30 रा. आंबेगाव पठार, पुणे) असे लाच घेताना अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सायबर युनिट कडे फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तुषार बनकर याने संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच (bribe) देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपी तुषार बनकर याने तक्रारदार यांच्याकडे फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी पीएसआय संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सुखसागर नगर चौकातील स्वामी समर्थ स्नॅक सेंटर जवळ पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारताना तुषार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.
Web Title: Demand for bribe of 1 lakh rupees for police officer, private person caught
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study