ब्रेकिंग न्यूज : कृषी सेवा केंद्रास आग, २७ लाखांचे नुकसान
Breaking News | Ahmednagar: मध्यरात्रीच्या सुमारास कृषी सेवा केंद्रास आग (Fire).
राहता : चितळी येथील मौनगिरी कृषी सेवा केंद्रास मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने विविध प्रकारचे बी-बियाणे, रासायनिक औषधे, खतांसह दुकानातील फर्निचर व संगणक संच जळून खाक झाले. यात सुमारे २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशाने लागली, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की राहाता तालुक्यातील चितळी स्टेशन येथे सरपंच नारायणराव कदम यांचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्या मालकीचे पुरुषोत्तम गायकवाड यांच्या गाळ्यात भाडेतत्वावर मौनगिरी कृषी सेवा केंद्र हे दुकान आहे. कदम रविवारी (दि. २४) रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले असता, मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या आतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ बाहेर येऊ लागले. स्थानिक नागरिक संपत वाघ हे गणेशनगर कारखाना येथून कामावरून सुटी झाल्यानंतर घरी जात असताना त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ कदम यांच्या घरी जाऊन त्यांना घटनेची माहिती दिली.
याप्रकरणी दुकानाचे शिवाजीराजे कदम यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नामांकित कंपनीचे औषधी, बी-बियाणे, कीटकनाशके यांच्यासह दुकानातील महत्वाची कागदपत्रे व संगणक, प्रिंटर, कुलर, फर्निचरसह, सीसीटीव्ही कॅमेरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संपूर्णपणे जळून खाक झाले असून २७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, आकस्मिक जळीत प्रकरणी नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एम. पी. शिंदे करत आहेत.
मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्यानंतर विविध बी-बियाणे यांची मागणी वाढली असल्याने लाखो रुपये किंमतीच्या मालाची नुकतीच खरेदी केली होती; परंतु आग लागल्याने बियाण्यासह सर्व औषधे जळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
Web Title: Fire at Krishi Seva Kendra, loss of 27 lakhs
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News