अहमदनगर: 25 हजाराची लाच स्विकारताना ग्रामसेवक रंगेहाथ चतुर्भूज
Ahmednagar News: संगमनेर निवासी असलेल्या ग्रामसेवकाला कर्तव्य बजावण्याच्या मोबदल्यात 25 हजाराची लाच (Bribe) घेतांना रंगेहाथ चतुःर्भूज करण्यात आले.
कोपरगाव: सिन्नर तालुक्यात कार्यक्षेत्र मात्र संगमनेर निवासी असलेल्या ग्रामसेवकाला कर्तव्य बजावण्याच्या मोबदल्यात 25 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ चतुःर्भूज करण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जवळके (ता. कोपरगाव) येथे येवून सदरची कारवाई केली असून नितीन सगाजी मेहेरखांब असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामसेवकाला गजाआड करण्यात आले आहे.
याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदाराचे सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द या ठिकाणी गावठाणात जुने राहते घर आहे. मध्यंतरी त्यांनी आपल्या घराचा दर्शनी काही भाग आणि ओटा काढून घराचे नूतनीकरण करताना दोन मजली घर बांधले. सदर इमारतीची नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात नोंद व्हावी व त्याची घरपट्टी निश्चित करावी यासाठी त्यांनी पाथरे खुर्द ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या नितीन मेहेरखांब या ग्रामसेवकाशी संपर्क साधला.
यावेळी त्याने तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर सदरची रक्कम दोन हप्त्यात देण्याचे ठरले व लाचेचा हप्ताही बुधवारी (ता. 12) देण्याचे ठरले. त्यानुसार ठरलेल्या रकमेचा पहिला हप्ता ग्रामसेवक सांगतील त्या ठिकाणी पोहोच करण्याचेही ठरले. मात्र तक्रारदाराने केलेले घराचे बांधकाम नियमानुसार असल्याने त्यांनी सदरील लाचखोर कर्मचार्याला कायमची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
नाशिक एसीबीला तक्रार प्राप्त होताच या विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांना सापळा लावून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार श्रीमती घारगे-वालावलकर यांनी पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी व चालक पो. ना. परशुराम जाधव यांच्यासह बुधवारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील जवळके (ता. कोपरगाव) येथे सापळा लावला. यावेळी आपल्या अलिशान वाहनातून आलेल्या ग्रामसेवकाने तक्रारदाराकडून एसीबीद्वारा प्राप्त पावडर लावलेली 25 हजारांची रक्कम हातात घेताच आसपास वेशांतर करुन दबा धरुन बसलेल्या पथकाने झडप घालीत त्याला जागेवरच चतुःर्भूज केले.
Web Title: Gramsevak Rangehath Chaturbhuj while accepting a bribe of 25 thousand
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App