Home नाशिक जिगरबाज आईने घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उड़ी, थरारक प्रसंग

जिगरबाज आईने घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उड़ी, थरारक प्रसंग

Nashik Burning Bus Accident:  ट्रक आणि बसच्या अपघातात इंधनाच्या टाकीने स्फोट घेतल्याने बसला आग, १२ जणांचा मृत्यू.

Jigarbaz mother jumped from the window of the burning bus with her baby

नाशिक: महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आज नाशिक येथे घडली आहे. औरंगाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात १२ लोकांचा आगीत जळून मृत्यू झाला. ट्रक आणि बसच्या धडकेत इंधनाच्या टाकीने स्फोट घेतला. त्यामुळे बसला आग लागली. या आगीमुळे बसमधून प्रवास करणारे १२ प्रवाशी मृत्युमुखी पडले. तर ३८ जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू •आहे. या दुर्घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

थरारक प्रसंग

या दुर्घटनेत मूळ वाशीम जिल्ह्यातील रहिवासी विवाहिता पूजा मनोज गायकवाड (27) या त्यांचा आठ वर्षांचा मुलगा व दोन वर्षांचा मयंक आणि १९ वर्षीय मामेभाऊ गणेश लांडगे यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी या बसमधून प्रवास करत होत्या. या दुर्घटनेतून बचावलेल्या पूजा म्हणाल्या की, मी माझ्या दोन मुलांना सोबत घेऊन भाऊ गणेश सोबत प्रवास करत होते. चालक बाजूने तीन क्रमांकाच्या सीट वर आम्ही बसलेलो होतो. मुलांसह मला ही पहाटेची साखरझोप लागली होती तेव्हा बसला अचानक समोरून मोठा ट्रक येऊन धडकला आणि आम्हा सर्वांना मोठा हादरा बसला. आम्ही खडबडून जागे झालो. या धडकेमुळे क्षणार्धात बसला आग लागली व टायर फुटल्याचा आवाज झाला. सगळा आक्रोश रडारड बसमध्ये प्रवाशांची सुरू होती.

काही वेळेतच पाठीमागूनही आग लागली आणि ती बसमध्ये आल्याने मागील प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लक्षात आले. भाऊ दरवाजाकडे धावला मात्र दरवाजा काही उघडला नाही. अखेर बसची खिडकीची काच फोडली. अगोदर भाऊ खाली उतरला व मी दोघा लेकरांना त्याच्याकडे खिडकीतून सोपविले. त्यानंतर मीसुद्धा खिडकीतून बाहेर पडले. यावेळी काही स्थानिक लोक बसबाहेर मदतीला धावले. आम्ही आमच्या डोळ्यांसमोर बसला आगीत कोळसा होताना बघितले. आम्ही थोडक्यात बचावलो, काळ आला होता पण दैव बलवत्तर असल्याने वाचलो आम्हा तिघांचा नवा जन्म झाला. आमच्यासमोर काही तास सोबत राहिलेले सहप्रवासी जळून मेले. हा आयुष्यात घडलेला सर्वात वाईट प्रसंग असून तो कायमचा मनावर कोरला गेला.

Web Title: Jigarbaz mother jumped from the window of the burning bus with her baby

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here