कंटेनर आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात, ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
कोपरगाव | Accident: कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ दि.१० शनिवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास कांदा घेऊन कोकमठाणहून कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रोलीला कंटेनरची जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने कोकमठाण गावात शोककळा पसरली आहे.
शंकर खंडेराव लोहकने वय ३० रा. कोकमठाण ता. कोपरगाव या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शंकर लोहकने हा शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये कांदा भरून कोपरगावच्या दिशेने निघाला असता संत जनार्दन स्वामी आश्रमजवळ आला असता मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने आर.जे. ०६ जी.सी.४६२१ ने ट्रॅक्टर क्रमांक १११० यास मागील बाजूने जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रोली रस्त्याच्या कडेला काटवनात जाऊन पलटी झाली. ट्रॅक्टर चालक हा गंभीर जखमी झाला. जखमी शंकरला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरनी त्यास मृत घोषित केले. अपघता नंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ गोकुळ लोहकने यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात फिर्याद दिली असून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
Web Title: Kopargaon Container tractor Accident Tractor Driver Death