Home संगमनेर अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी महामार्गावरील खड्डे बुजविले

अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी महामार्गावरील खड्डे बुजविले

बोटा: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनांचे टायर फुटून अपघाताच्या घटना घडत आहे. याचवेळी बारामतीला निघालेले अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी थांबून तरुणांबरोबर श्रमदान करीत खड्डे बुजविण्यास मदत केली.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर कर्हे घाट ते आळे खिंड दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने खड्डे चुकविता चुकविता वाहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी रात्री दिवाळीसाठी पुण्याकडून नाशिककडे निघालेल्या चाकरमण्यांच्या बऱ्याच गाड्यांचे टायर फुटले. अपघातही होत आहे. या खड्ड्यांमुळे कोणाला जीवही गमवावा लागू नये म्हणून बोटा येथील बोटा स्वच्छ अभियानाचे सदस्य अस्लम शेख, अमित शेळके, खंडू जाधव, दीपक हांडे, शुभम कुलकर्णी, प्रवीण वाकचौरे, गणेश शेळके,विजय पानसरे, सौरभ शेळके, दिनेश निकम या तरुणांनी हे खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. रविवार सकाळी फावडे, घमेले आदी साहित्य घेऊन हे सर्व तरुण बाह्यवळण आणि महामार्गावरील खड्ड्यांमध्ये माती टाकून ते बुजविण्याचे काम करीत होते.

दरम्यान अकोल्याचे आमदार लहामटे अकोले येथून घारगाव मार्गे बारामतीला निघाले होते. त्याचवेळी बाह्यवळण रस्त्यावर काही तरुण रस्त्यावर श्रमदान करीत असल्याचे त्यांना दिसले. लहामटे यांनी तत्काळ गाडीतून उतरून हातामध्ये घमेले घेऊन त्यांनीही त्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यास सुरुवात केली. आमदार लहामटे श्रमदान करीत असल्याचे पाहून ग्रामस्थही पुढे सरसावले.  

पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. असे असूनही टोल वसूल केला जात आहे.महामार्गावर बऱ्याच ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. रस्त्याचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत उपस्थित करून निधी मिळविण्यासाठी पुढील काळात पाठपुरावा करणार आहे.:- डॉ. किरण लहामटे, अकोले आमदार   

Website Title: Latest News Akole MLA Kiran Lahmte drilled pits 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here