Home संपादकीय अकोल्यातील धक्कादायक निकालाचा अन्वयार्थ

अकोल्यातील धक्कादायक निकालाचा अन्वयार्थ

अकोले:        चुरशीची होणार असे म्हणत-म्हणत निवडणुकीने सर्वांनाच चकवा दिला आणि ती एकतर्फी कधी झाली ते कोणालाच कळले नाही. खरेतर या मतदारसंघावर मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड या पिता-पुत्रांचे एकहाती वर्चस्व. अशातच या पिता-पुत्रांनी केलेले पक्षांतर. आता सर्वच एक झाले, मग समोर आहेच कोण ? असा उरलेला प्रश्न.
       मात्र निवडणूक जाहीर झाली अन वातावरण फिरायला लागले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सभेला स्वतःच्या पायाने चालत आलेल्या गर्दीने, सर्वांनाच चकित करून टाकले, अन निवडणुकीत जनतेनेच हळूहळू रंग भरायला सुरूवात केली. या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकास-एक उमेदवार देण्यात विरोधकांना आलेले यश. त्यात ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे व दशरथ सावंत यांनी वडीलकीच्या नात्याने बजावलेली भूमिका आणि राज्य पातळीवर शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या डॉ.अजित नवले यांनी वापरलेले बुद्धीचातुर्य यांचा मोलाचा वाटा. 
          उमेदवार संगमनेर मधून फायनल झाला तेथेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकदिलाने लढणार हे निश्चित झाले. खेळ आणि राजकारण अशा दोन बाबी आहेत,  जिथे लोकांना कट्टरता आवडते. राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार असाच कट्टर विरोधक. उमेदवार जाहीर झाल्या बरोबरच आता निवडणूक चुरशीची होणार हे जाणकारांच्या लक्षात आले. तशातच राजकीय सूडाचा कंगोरा घेऊन उभे राहिलेले ईडी प्रकरण आणि त्यातून शरद पवारांनी घेतलेली उभारी. अशा सर्वचबाबी येथील निवडणुकीवर कळत-नकळत परिणाम करत राहिल्या.  
          शरद पवारांनी अनपेक्षितपणे प्रचाराच्या मध्यावरच अकोल्यात सभा घेऊन पुन्हा एकदा सर्वांनाच चकित केले. अगदी दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत अकोल्यातील जनतेने शरद पवारांचे अभूतपूर्व स्वागत केले, अन नेता नसलेल्या पक्षात प्रत्येक कार्यकर्ताच नेता झाला.
        राज्य पातळीवर जरी ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी अकोल्यात मात्र ती शरद पवार विरुद्ध मधुकरराव पिचड अशीच होणार हे स्पष्ट झाले. अर्थात या निवडणुकीत अकोल्यातील मतदारांचे पृथक्करण कमालीचे वैशिष्ट्यपूर्ण राहिले. राजकीय विश्लेषण करत असताना मतदारांची होणारी आडवी आणि उभी अशी कोणत्याच प्रकारची विभागणी मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या बाजूने जाणारी दिसली नाही.
         
      अकोल्यातील एकूण जनता ही या निवडणुकीत प्रामुख्याने पाच गटात विभागली गेली. पहिली विभागणी  पिचड समर्थक विरुद्ध पवार, भांगरे व लहामटे समर्थक अशा मोठया दोन गटांत झाली. तालुक्यातील बिगर आदिवासी भागात पवार समर्थक जास्त संख्येने होते, तर तालुक्यातील आदिवासी भागात भांगरे व लहामटे समर्थक जास्त संख्येने होते. तालुक्याच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा तिसरा गटही या निवडणुकीत अधिक जोमाने सक्रिय झाला, तो म्हणजे कम्युनिस्ट विचारांचा, शेतकरी नेते डॉ. अजित नवले समर्थकांचा गट.
       अर्थात याही पलीकडे येथे कार्यरत असलेल्या आणखी एका चौथ्या फॅक्टरने निवडणुकीत मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्यासमोर अडचण उभी केली, तो म्हणजे कट्टर पिचड विरोधक मतदार. पक्षांतरांने जरी सर्व नेते एक झाले असले, तरी या मतदारांनी आपली पारंपरिक भूमिका मात्र सोडली नाही. आणि यात प्रामुख्याने शिवसेना व भाजप समर्थकांची संख्या मोठी होती. या गटाचे नेतृत्व शिवसेना नेते बाजीराव दराडे आणि त्यांचे सहकारी यांनी केले. 
      याचवेळी महत्त्वाचा असा पाचवा गट निवडणुकीत कार्यरत होता. अगदी पक्षांतर करताना देखील मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांचेकडून तो दुर्लक्षित झाला, असे दिसले. तो गट म्हणजे मतदारसंघात नव्याने उभा राहिलेला, भाजपला विरोध करणाऱ्या मतदारांचा गट. अगदी चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीने देखील हे दाखवून दिले. याच लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील डाव्या व पुरोगामी विचाराच्या जनतेने, सध्याच्या उजव्या विचाराच्या सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीतील फोलपणा ओळखला व त्यांना मतदानातून नाकारले. गेली वर्ष-दोन वर्षात भाजप विरोधी असा एक मोठा गट मतदारसंघात स्पष्टपणे उदयास आला आहे. 
        मतदारांची अशी आडवी विभागणी मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या बाजूने जाणारी नव्हतीच, पण संघटनात्मक पातळीवर देखील त्यांच्यासमोर पक्षांतरांने मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या. विधानसभेचा हा मतदारसंघ जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटांत विभागलेला आहे, मतदारांची ही उभी विभागणी म्हणता येईल.
       सहा पैकी प्रत्येकी तीन-तीन गटांवर प्रतिस्पर्धी गटांचे समान वर्चस्व. समशेरपूर, राजूर आणि सातेवाडी गटांवर अनुक्रमे बाजीराव दराडे, अशोकराव भांगरे आणि उमेदवार डॉ. किरण लहामटे यांचे वर्चस्व. परिणामी या गटांत तालुक्यात झालेल्या एकूण सरासरी मतदानाच्या सहा ते आठ टक्के मतदान अधिक झाले. हे वाढीव मतदान येथील कार्यकर्त्यांची निवडणुकीतील मेहनत आणि प्रामाणिकपणा याकडे लक्ष वेधून घेते.
      याउलट देवठाण, अकोले आणि कोतुळ हे जिल्हा परिषदेचे गट मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या समर्थकांच्या ताब्यात असूनही तिथुन स्पर्धेत रंग भरणे त्यांना शक्य झाले नाही. जिल्हा परिषदेच्या या सहा गटांशिवाय या मतदारसंघात समाविष्ट आहेत, ती संगमनेर तालुक्यातील पठार भागातील 32 गावे. पठार भागातील जनतेने या निवडणूक निकालावर परिणाम करावा, अशी संधी उर्वरित जनतेने यावेळेला पठार भागातील जनतेला दिलीच नाही, अर्थात त्यांचाही कौल मतदारसंघातील इतर जनतेप्रमाणेच राहिला आहे. 
           अगोदर उल्लेखलेले मतदारांची आडवी विभागणी झालेले पाचपैकी चार गट मा. मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या विरोधात या निवडणूकीत एकत्र आले. त्यातून निर्माण झालेले आव्हान परतवून लावण्यात संघटनात्मक पातळीवर पिचड समर्थकांना अपयश आले. खरेतर हे आव्हान समजून घेऊन लढाई लढणे असे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले दिसले नाही. 
        या सर्व विश्लेषणातून एक बाब अगोदरच स्पष्ट झाली होती, ती म्हणजे विद्यमान आमदार स्पर्धेत राहिले तर ते फार कमी मताधिक्याने निवडून येतील. मात्र जर डॉ. किरण लहामटे आमदार होणार असतील तर ते मात्र मोठ्या फरकाने निवडून येतील. घडलेही तसेच. या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय समीकरणांवर ताबडतोब विशेष परिणाम होईल असे नाही. मात्र या निवडणुकीने तालुक्याला बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत आणि बऱ्याच काही नव्याने दिल्या आहेत. विशेषतः स्थानिक मीडिया म्हणजेच वेब पोर्टल, यु ट्यूब चॅनल यांनी या निवडणुकीत वैशिष्ट्यपूर्ण भूमिका बजावली. ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे यांची तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री झाली आणि विरोधक कधी नव्हे एवढे एकसंघ व एकमेकांशी प्रामाणिक राहिलेले जनतेला पहायला मिळाले. 
डॉ. नितीन आरोटे
लेखक संविधानाचे अभ्यासक 
Website Title: Latest News Explanation of the shocking result in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here