Home अकोले अकोले : भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; धरणातून १० हजार क्युसेक्सने विसर्ग...

अकोले : भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; धरणातून १० हजार क्युसेक्सने विसर्ग सुरूच

भंडारदरा : भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून प्रवरा नदीत १० हजार ९९ क्युसेक्सने सोडले जात असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध झाली आहे. भंडारदरा धरणात १० हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी कायम ठेवून अतिरिक्त पाणी १५ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली आहे. रतनवाडीत पाऊस सुरूच असून, येथे तब्बल १२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण दोनच दिवसांपूर्वी भरले. धरणातून निळवंडे जलाशयात २० हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात होते. भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असून, हा विसर्ग आता १० हजार ९९ क्युसेक्सपर्यंत आला आहे. धरणातून विसर्ग चालू आहे तोपर्यंत अंब्रेला धबधबा सुरूच राहणार आहे. पाण्याची आवक कमी झाल्यास वीजनिर्मिती केंद्रासह अंब्रेला धबधबाही बंद करण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात आले.

तीन दिवसांपासून भंडारदरा परिसरात पावसाने हाहाकार उडविला होता. परंतु सोमवारी दुपारपासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक कमी झाल्याने भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर सोमवारी सकाळीसुद्धा कळसुबाई परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने पेंडशेत येथील पूल पाण्याखाली गेला होता. काल परिसरातील शाळा तसेच महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.

२४ तासात भंडारदरा येथे १३५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, रतनवाडी ३१० मि.मी., घाटघर २२० मि.मी., पांजरे १३२ मि.मी. पाऊस झाला. कृष्णवंती नदी १५०७ क्युसेक्सने वाहत होती. भंडारदरा धरणावर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २९ मि.मी. पाऊस पडला. भंडारदरा धरणात १० हजार ५०७ दलघफू पाणी असून जादा पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.

Website Title: Latest News Akole : Rainfall Over Bhandardara Floodplain; The Erosion Started With 10000 Cusecs From The Dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here