कोतूळ ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र बेवारस
कोतूळ: कोतूळ ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून एकही डॉक्टर नसल्याने आदिवासी भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. गुरुवारी रात्री केळी गारवडी येथील प्रतीक्षा तुकाराम बांगर या तीन वर्षाच्या चिमुकलीला दंश झाला मात्र रुग्णालयात डॉक्टर नसल्याने या आदिवासी कुटुंबाची परवड झाली. त्यामुळे येथील अनागोंदी कारभार उघड झाला.
कोतूळ ग्रामीण रुग्णालयात गेल्या चार वर्षापासून नवीन नियुक्त झालेल्या डॉक्टरांचे राजीनामा सत्र सातत्याने सुरु आहेत. कोणताही नवनियुक्त अधिकारी महिना दोन महिन्यात राजीनामा देतो यामागील कारण जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा अधिकाऱ्यांना माहित असूनही ते गप्प आहेत.
तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे ४५ आदिवासी खेडी व पाडे सलग्न आहेत. दररोज सरासरी दीडशे बाह्यरुग्ण व १५ अंतर्रुग्न घेतात. सर्पदंश, अपघात, प्रसूती, कुटुंब नियोजन अन्य शस्त्र क्रीया येथेच होतात. सुमारे पाच वर्षापूर्वी पाच कोटी रुपये खर्च करून शासनाने येथे अद्यावत इमारत, शस्त्रक्रिया विभाग, तीस बेड, टीबी असे स्वतंत्र कक्ष उभारले आहेत. मात्र नामधारी वैद्यकीय अधिकारी नेमले जात असल्याने हे अधिकारी येथे थांबतच नाही. दर महिन्याला आरोग्य केंद्राचे अधिकारी पाच दहा दिवसाच्या रजेवर जातात. तर नवीन नियुक्त केलेले अधिकारी शासकीय नोकरीचा राजीनामा देतात. गेल्या पाच वर्षात राजीनामा देण्याची परंपरा कायम आहे. चार महिन्यापूर्वी नियुक्तीस आलेले डॉक्टर भांगरे यांनी राजीनामा दिला असल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. कोतूळ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कारभार एकत्र चालतो. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर भागवत कानवडे हे आजारी असल्याने ते गेल्या चार दिवसांपासून दहा दिवसांसाठी आजारपणाच्या रजेवर गेले आहे. तर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर वानखेडे हे मागील महिन्यात आजारपणाचा रजेवर होते. सध्या हे दोन्ही विभाग वैद्यकीय अधीक्षकविना आरोग्य केंद्र बेवारस आहे.
Website Title: Latest News Kotol Rural Hospital Health Center