Home संपादकीय महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाची उकल लेख : पॉवर ऑफ शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाची उकल लेख : पॉवर ऑफ शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाची उकल करणारा विशेष लेख 
                    “पॉवर ऑफ शरद पवार”
        “जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीए” हा हिंदी सिनेमातील डायलॉग, आपण बऱ्याचदा ऐकतो. मापदंड म्हणून कधी स्वतःला तर कधी दुसऱ्या कुणाला तरी जोडून पाहतो. पण तीच जिंदगी ‘लंबी’ ही असेल आणि ‘बडी’ ही असेल तर! तर, असे नाव आहे #शरद पवार. 
  
       वयाच्या 27 व्या वर्षी स्वतःच्या हिमतीवर विधानसभेचा आमदार होणं आणि वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या नावाजलेल्या घटकराज्याचा मुख्यमंत्री होणं, या दोन्ही बाबी शरद पवारांच्या ठिकाणी असलेल्या राजकीय व डावपेचात्मक क्षमतेची जाणीव करून देणाऱ्या आहेत. 
   
          आज देशभरातील विरोधी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. काश्मीरपासून केरळपर्यंत सर्वच विरोधी पक्षांवर अशी वेळ आली आहे. गेली पाच वर्ष अनेक घटकराज्यांत साम-दामच्या आधारे सरकारे घडविणे किंवा बिघडविणे असे असंसदीय प्रकार राजरोस सुरू आहेत. शक्य तिथे विरोधी पक्षांचे आमदार, खासदार, महत्वाचे नेते- कार्यकर्ते फोडून सत्ताधारी पक्षात भरती केले जात आहेत. नकळत काँग्रेस मुक्त भारताची मोहीम, विरोधीपक्ष मुक्त भारताच्या दिशेने वळविली गेली आहे. 
         पाच वर्षापूर्वी केंद्र आणि घटकराज्य अशा दोन्ही ठिकाणी सत्ता बदल झाला. नव्या सत्ताधाऱ्यांनी  राजकारणाची पद्धती बदलली. बदललेल्या पद्धतीची झळ विरोधी पक्षांनाही बसु लागली. असे असूनही स्वतः शरद पवारांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध कधी दंड थोपटले नाहीत किंवा विरोधी पक्षाचे खासदार म्हणून संसदीय कामकाजात अनावश्यक अडथळेही आणले नाहीत. उलट सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचेच त्यांचे धोरण राहिले. 
         सत्ताधारी पक्षाच्या धुरीणांनी गत लोकसभा निवडणुकीपासून मात्र शरद पवारांना डिवचण्यास सुरुवात केली. त्यांचा पक्षच अस्तित्वहीन कसा होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पक्षातील अनेक आमदार, खासदार, वरीष्ठ नेते यांना फोडून पक्ष दुर्बल करण्याचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. तिरकस टीका करून शरद पवारांनाही नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. 
        
        डावपेच हा राजकारणाचा महत्वाचा भाग. शरद पवार हे त्यातील महामेरू. डावपेच हेच राजकारण, असे समीकरण या देशात कोणाच्या नावाने रूढ झाले असेल तर ते नाव, म्हणजे शरद पवार. चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेने राजकारणाचे अनेक डावपेच उलगडून दाखवले. भल्या-भल्यांनी चाणक्य नीतीचा वापर करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना गारद केले.     
        मात्र चाणक्यालाही लाजवतील असे अनेक डावपेच शरद पवारांनी आजपर्यंत त्यांच्या राजकारणात वापरले आहेत. अनेक धूर्त चाली चालविल्या, अनेकांना चितपट करून अस्मान दाखविले. त्यातून त्यांची प्रत्येक कृती आणि शब्द हा डावपेचाचा भाग असतो, असा समज लोकांच्या मनात निर्माण झाला. खरेतर अनेक प्रसंगात अनुभवही तसेच आले आहेत. मग तो प्रसंग एक मताने अटल बिहारी वाजपेयी याचं सरकार पडण्याचा असो अथवा न मागताच २०१४ ला महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देण्याचा असो. शरद पवारांचे डावपेच भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकणारे आणि अनेकांची कायम कोंडी करणारे राहिले आहेत.
       काय वैशिष्ट्य आहे शरद पवारांच्या राजकारणाचे. कितीही टीका झाली, त्यातून राजकीय पीछेहाट झाली, तरी संयम सोडायचा नाही. हिम्मत हारायची नाही. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी योग्य वेळ आणि संधीची वाट पहायची. मागितला नसतानाही २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणं आणि आज त्याच भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला स्वाभिमानाची आठवण करून देणं, हे सर्व शरद पवारांच्या डावपेचाच भाग. आजचा सत्ता स्थापनेचा तिढा, हे त्याचेच फलित.
       सत्ताधारी पक्षाच्या महत्वाकांक्षी राजकारणाने विरोधी पक्षच उरला नाही, अशी स्थिती. आता लोकशाहीत निर्माण झालेली विरोधी पक्षाची अभूतपूर्व पोकळी, कोण भरून काढणार ? निवडणुका कशा होणार, लोकशाहीचे कसे होणार ? याकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर उभ्या भारताचे लक्ष लागून राहिले. लोकसभा निवडणुकीत त्वेषाने लढूनही राहुल गांधींच्या पदरी निराशा आली. या अनुभवातून त्यांनी मैदान सोडले. गैरव्यवहाराच्या आरोपावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम इडीच्या कारवाईत नुकतेच तुरुंगात गेले. अशा स्थितीत मैदानात उतरून दोन हात करण्याची हिम्मत, कोण दाखवणार ? याचे सर्वांनाच कुतूहल. 
       वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांनी ती हिम्मत दाखविली. जाहीरपणे घर सोडले, मोहीम फत्ते करूनच घरी परतणार असा विश्वास दिला. साताऱ्याच्या पहिल्या सभेने ‘बंदेमे कुछ दम है’ याची चुणूक पहायला मिळाली. इडीच्या कारवाईच्या भीतीने देशभर भल्या-भल्यांची गाळण उडालेली, सर्वांनीच पहिली. त्याच इडीच्या कथित चौकशीचे प्रकरण शरद पवारांभोवती उभे राहिले. मात्र अत्यंत चतुराईने त्यांनी ते परतवून लावले. 
        पक्षातंराने निर्माण झालेले आव्हान शरद पवारांनी संधी मानले. नव्या दमाच्या, तरुण कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. सोबत आघाडीतील सहकारी काँग्रेस पक्षाला देखील ते मार्गदर्शन करत राहिले. एखाद्या तरुणाला लाजवेल असा झंझावाती प्रचार सुरु केला. जनतेचाही त्यांना तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेळेचे काटेकोर नियोजन केले. प्रसंगी प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. प्रचारात निसर्गाने आणलेल्या अडथळ्यांवर त्यांनी मात केली. खुबीने जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी त्याचा वापर केला. 
         वस्तुतः सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला की घोडेबाजाराला, फाटाफुटीला, पक्षांतराला ऊत येतो. हे अगदी पूर्वीपासून घडत आले आहे. या निवडणुकीत मात्र अगोदरच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांपैकी बहुतेक उमेदवारांना पराभूत करण्याची किमया शरद पवारांनी साधली. परिणामी विरोधी पक्षातील नवनिर्वाचित आमदाराने पक्ष सोडण्याचे धाडस करणे आजतरी अशक्य. बरे- वाईट, जसे उपलब्ध असतील अशा मार्गांचा वापर करायचा आणि सरकार स्थापन करायचेच, असा हातखंडा असणारे, आज शरद पवारांच्या राजकारणाने गलितगात्र झाले आहेत.
           सर्व काही संपलेलं असताना निवडणूकीच्या रणांगणात मध्यभूमीवर हा माणूस पाय रोवून एकटा उभा राहिला. तेंव्हापासून आजपर्यंत या माणसाने मध्यभूमी सोडलेली नाही. खरं तर कोणीच सोबत नसताना एकट्याने पाय रोवून उभे राहण्याचे धाडस केले आणि निवडणूकीचे स्वरूपच बदलून टाकले. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? असा उपस्थित केला गेलेला, जाहीर प्रश्न. नगर जिल्ह्यातील पत्रकाराने नातेवाईकांनी पक्ष सोडण्यावर विचारलेला प्रश्न आणि इडीच्या कथित चौकशीचे प्रकरण, या तीन घटना या निवडणुकीला कलाटणी देणाऱ्या ठरल्या, असे दिसते.
  
       निवडणुकीच्या राजकारणात अपेक्षित आकडेवारी गाठण्यात शरद पवार यशस्वी झाले नसतीलही, तरी देखील ही निवडणूक ऐतिहासिक बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वर्तमान निवडणूकीतील त्यांचे वर्तन हे सर्वच विरोधी पक्ष आणि बहुजनवादी राजकारण आकारास आणू पाहणारे कार्यकर्ते यांना स्वतःच्या राजकीय शक्तीची जाणीव करून देणारे आहे. 
        सत्तेच्या दिशेने वेगाने निघालेल्या सत्ताधाऱ्यांच्या रथाला आणि राजकारणाला ब्रेक लावण्याचे काम शरद पवारांनी या निवडणुकीत केले. हा ब्रेक इतका करकचून लागला आहे की सर्वाधिक संख्याबळ असूनही त्यांना सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग सापडत नाही. खरंतर कोणताच आशेचा किरण समोर दिसत नसताना, या माणसाने वयाच्या 80 व्या वर्षी राजकारणाच्या सारीपाटावर एक नवा डाव सुरु केला. अंतिमतः निवडणुकीच्या राजकारणातील आकडेवारीत तो हरला असला, तरीही स्वतः जिंकला आणि येथील लोकशाहीलाही त्याने जिंकुन दिले. 
Doctor Nitin Arote
डॉ. नितीन आरोटे
लेखक संविधानाचे अभ्यासक आहेत
Website Title: Latest News Power of Sharad Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here