Home अकोले अकोले: रोटरी क्लबचे कार्य समाजासाठी दिशादर्शक : विश्वास पाटील

अकोले: रोटरी क्लबचे कार्य समाजासाठी दिशादर्शक : विश्वास पाटील

अकोले(प्रतिनिधी)-रोटरी क्लब हा श्रीमंत लोकांचा क्लब समजला जात असला तरी सांगली,कोल्हापूर सारख्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्यासारख्या विविध सामाजिक कार्यात रोटरी क्लबचे  पदाधिकारी व सदस्य धावून जात  आहेत.ही प्रशंसनीय बाब आहे. समाजाला वेगळी दिशा देण्याचे कार्य रोटरी क्लब करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केले.
 अकोले  रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा पद्ग्रहन सोहळा  येथील महाराजा लॉन्स येथे पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील बोलत होते.प्रारंभी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी संपादित केलेल्या ‘अमृतरत्न’ या बुलेटिन चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महाराजा लॉन्स चा आकर्षक व नयनरम्य परिसर, शहर व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती,सोहळ्या दरम्यान  विशाल पडद्यावर होणारे सादरीकरण,आकर्षक रंगमंच,सत्काराला मिळणारी सुरेख संगीताची साथ, उत्साही अकोलेकरांची उपस्थिती आणि विश्वास पाटील यांचे मंत्रमुग्ध करणारे प्रभावी व्याख्यान अशा वातावरणात झालेला हा समारंभ संस्मरणीय
 ठरला.
यावेळी लिज्जत पापड,पुणे चे कार्यकारी संचालक सुरेश कोते,संगमनेर इतिहास मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संतोष खेडलेकर,रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे उपप्रांतपाल रो उल्हास धुमाळ,क्लब सल्लागार रो.सुनील कडलग,डिस्ट्रिक्ट 3132 चे पब्लिक इमेजचे चेअरमन तथा  क्लब चे संस्थापक रो.अमोल वैद्य माजी अध्यक्ष रो सचिन देशमुख, 2019-20 चे  नूतन अध्यक्ष रो. सचिन शेटे,सचिव रो.डॉ. रवींद्र डावरे,उपाध्यक्ष रो.प्रवीण झोळेकर ,खजिनदार रो. मयूर रासने, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी बोलतांना  श्री.पाटील म्हणाले की-इतिहास विसरू नका,जे लोक इतिहास विसरतात ते कदापिही इतिहास घडवू शकत नाहीत. आपल्या  पूर्वजांनी इतिहास घडविला याचा अभ्यास तरुण पिढीने केला पाहिजे.तरुणांनी इतिहासाचे नीट संशोधन केले पाहिजे.
  मराठी भाषा ही निरंतर राहणार असून ती नटरंगी व वर्णन करायला सुंदर आहे.आपल्या मातृभाषेवर प्रेम करा, तरुण मुलांनी इतिहास घडवावा, अभ्यास करावा ,इतिहास, संस्कृती, भाषा, माणसांवर ,परिसरावर प्रेम करा,कळसुबाई इतकी उंची गाठा,  आजू बाजूला
असणारे स्फुर्तीचे झरे शोधा  व चैतण्याचे झरे बना असे आवाहन त्यांनी केले.
अकोले तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून मराठी शाळेत विद्यार्थी येत असल्याचे  प्रारंभी शिक्षकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर आपणही मराठी शाळेतून शिकल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या गावात 10 वी पास होणारा मी पहिलाच विद्यार्थी आहे.वयाच्या 28 व्या वर्षी पानिपत ही कादंबरी लिहिली.आत्तापर्यंत 40 आवृत्या प्रकाशित झाल्या असून महानायक  व पानिपत या कादंबरीच्या लवकरच इंग्रजीतुन  वाचकांसाठी  अनुवाद उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र इतका जागृत आहे की केसाइतकी चूक वाचकांच्या नजरेतून सुटू शकत नाही.त्यामुळे संशोधकांनी  न चुकता संशोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लिज्जत पापड चे कार्य.संचालक सुरेशराव कोते, उपप्रांतपाल उल्हास धुमाळ, माजी प्रांतपाल सुनिल कडलग,  संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ संतोष खेडलेकर यांनी रोटरी क्लबच्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे कौतुक केले.अकोले तालुक्याचा वैभवशाली इतिहास व निसर्ग सौंदर्य,पर्यटन जगात पोहचविण्यासाठी रोटरी क्लब ने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
Latest News Rotary club social work Akole
स्वागत रोटरी चे संस्थापक अमोल वैद्य यांनी केले. प्रास्ताविक व अध्यक्षीय मनोगतातून मावळते अध्यक्ष सचिन देशमुख यांनी रोटरी च्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.नूतन अध्यक्ष सचिन शेटे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून  अकोले तालुक्यात सुरू असलेली सामाजिक व विद्यायक उपक्रमांची परंपरा कायम ठेऊ अशी ग्वाही दिली.सूत्रसंचालन घनश्याम माने यांनी केले तर आभार सचिव डॉ रविंद्र डावरे यांनी मानले.
चौकट-अकोले तालुक्यातील कळसूबाई,  शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेला पट्टाकिल्ला,हरिश्चंद्रगड,साम्रद ची  प्रसिद्ध सांदनदरी, अगस्ति आश्रम, दंडक अरण्य, निसर्ग सौंदर्य,गड, किल्ले,रंधा धबधबा, भंडारदरा -निळवंडे ही  धरणे, क्रांतिवीर राघोजी  भांगरे, माजी मंत्री दादासाहेब रुपवते, मधुकरराव पिचड, साहित्यिक दया पवार, डॉ.रावसाहेब कसबे, मामलेदार जाळल्याचा क्रांतिकारी इतिहास, डाव्या विचारसरणीचा वारसा असलेला तालुका म्हणून अकोलेची ओळख आहे.आपल्या जवळचा  इतिहास आपण पाहिला पाहिजे,अभ्यासला पाहिजे,काय सोनं आहे या मातीत हे पहात नाही असे सांगत  काश्मीर हे भारताचे नंदनवन असेल पण अकोले तालुका हा महाराष्ट्राचे नंदनवन असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी काढताच उपस्थितांतून टाळ्यांचा कडकडाट झाला.
Get  Latest Marathi News &  Sangamner &  Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local from all Cities Of Maharashtra.
Website Title: Latest News Rotary club social work

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here