Home संपादकीय स्वत:ला ओळखायला शिका : संपादन सतीश उखर्डे

स्वत:ला ओळखायला शिका : संपादन सतीश उखर्डे

स्वत:ला ओळखायला शिका …

या पृथ्वीतलावर ईश्वराने प्रत्येक माणसाला काही ना काही गुण, कौशल्ये दिलेले आहेत. पण ते ज्याचे त्याला जाणवावे लागते, ज्यांना अशी ’स्व’ ची ओळख वेळेवर पटते, अशी माणसे या जगात थोडीच असतात. यासाठी ‘मी’ आणि ‘माझे’ या चक्रातून त्याने बाहेर पडले पाहिजे. बाहेरच्या जगात थोडे डोकावून बघितले पाहिजे, तर स्वत:ची खरी ओळख पटू शकेल ! ईश्वराने माणसाला बुध्दी दिली आणि स्वत:साठी तिचा उपयोग कसा करायचा याला चालना मिळावी, अशी कल्पकताही दिली. या जगात स्वत:ला ओळखायला शिकणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्यातील गुण ओळखणे, शक्ती ओळखणे, आंतरिक प्रेरणा ओळखणं, स्वत:च्या आत्म्याचा आवाज ओळखणे अतिशय महत्वाचे आहे. ज्यावेळी तुम्ही तो ओळखाल तो तुमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असेल! जेव्हा आपण रोजच्या राहाट गाडग्यातून बाहेर पडून शांतपणे, तटस्थपणे स्वत:कडे पाहतो, आत्मपरीक्षण करतो तेव्हांच तो स्वत:बद्दल विचार करू शकतो. स्वत:शी संवाद साधतो. त्याचवेळी त्याला स्वत:चा शोध लागतो. 
तुमच्या आतमध्ये कितीतरी गुणांची, वैशिष्ट्यांची, कलांची दिव्य-भव्य खाण आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का ? तुमचं खरं रुप माहित नसेल, तुमच्या गुणांपासून तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुम्ही काहीच काम करु शकणार नाही, फार थोड्या लोकांना जिवंत असे पर्यंत आपल्यातला ख-या शक्तीची ओळख पटते आणि बहुतेकांना तर त्यांच्यामध्ये कुठला गुण होता, कुठलं कौशल्य होतं, याची ओळख न पटताच ते जगाचा निरोप घेतात. एखाद्या बलवान माणसाला त्याच्या बलाची ओळख करून द्यायला त्याला जागे करावे लागते. कित्येक वेळा आपण कार्य करत असताना खूप कष्ट पडतात, अडचणी येतात, संकटाशी सामना करावा लागतो. तेव्हांच त्याला आपल्या आतल्या सुप्त शक्तीचा सुगावा लागतो. एखाद्याला एखादी विशेष घटनाच जागृत करु शकते, जसे काही झाडांच्या पानांना ती चुरगळल्यावर सुगंध येतो. त्याचप्रमाणे माणसावर एखादं संकट कोसळल्यावरच माणसांमधले गुण, कौशल्य बाहेर येतात. आकस्मात एखादा भूकंप व्हावा, तशी घटना घडल्यावर त्यांच्या प्रतिभेवरची धूळ झटकली जाते आणि ती नव्या दमाने जागृत होते.
‘स्व’सामर्थ्याचा योग्य प्रकारे उपयोग करून तो आपले ध्येय साध्य करत असतो.  माणसाने आपल्या प्रयत्नांच्या मार्गावर चालत राहावे, पुढे-पुढे जात राहावे, कारण माणसाच्या ज्ञानाला, यशाला, कौशल्याला काही सीमाच नसते. स्वत:ची ओळख झाल्यावर आपल्या विकासाला, ऎश्वर्याला, समृध्दीला पारावार राहणार नाही, कित्येक वेळा ‘स्व’सामर्थ्याची ओळख नसल्याने भिती वाटते. स्वत:मधील दोष घालवता आले पाहीजे. स्वत:ची ओळख आपल्यामधल्या छोट्या-छोट्या भावभावनांतून करून घ्यायची असते. ज्याक्षणी तुम्हाला स्वत:चा उत्कर्ष करण्याची प्रेरणा मिळेल तो क्षण पकडा, ती संधी दवडू नका, तुमच्यातील सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी प्रेरणादायक पुस्तके वाचा. सततच्या वाचनामुळे तुम्हाला तुमचा आदर्श आणि ध्येय नेहमी नजरेसमोर दिसेल.
वटवृक्षाचे बीज मोहरीच्या दाण्यापेक्षाही फारच बारीक असते. त्या बीजात तो महान वृक्ष अप्रगट अवस्थेत असतो.त्याला योग्य परिस्थिती मिळाली की तो प्रगट होतो, बीजातला ’वट्वृक्ष’ जो ओळखतो तोच समर्थपणे कार्य करू शकतो, प्रत्येक माणसात कार्य करण्याची अमर्याद ‘शक्ती’ आहे. त्याची ओळख करून घेणे कारण आपल्या जवळच्या शक्तीसंचयाचा माणसाला अंदाज येत नाही. सूर्यकिरणात किती सामर्थ्य आहे ते आपल्याला समजत नाही पण तेच सूर्यकीरण जर भिंगातून एकत्र केले तर कागदही जळू शकतो म्हणून तुमच्या अंतरंगातील अमर्याद शक्तीच तुम्हाला ओळखायला मदत करेल, आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही गुणहीन, नकारात्मक विचारांच्या लोकांच्या संगतीत, सहवासात राहू नका कारण ’”संगती संग दोषेण” या न्यायाने तुम्हीही तसेच व्हाल. तुमची ताकद तुम्हालाच कळणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला क्रांती घडवायची असेल तर तुम्ही मात्र सदैव तत्पर राहा ! कधी कुणाचे भाषणे ऐकून, प्रेरणादायी पुस्तके वाचून, कोणाची कला पाहून, कुणाच्या आयुष्याचा पट तर कधी कुणाचे अपयश पाहून तुमच्यातील “स्पार्क” जागा होईल आणि तुम्हाला तेथून स्फुर्ती मिळेल.
त्याचे एक उदाहरण द्यायचे झाल्यास….पॅरीसमधला एक चित्रकार दिसायला खूप कुरुप होता, तो स्वत:चे खूप दु:ख करायचा, हताश व्हायचा पण त्याने स्वत:ला ओळखले, त्याच्या विचारात बदल नाही तर  क्रांती झाली, त्याचा मार्ग त्याने बदलला, तो इतके सुंदर चित्रे काढू लागला की, ती लोकांना खूप आवडू लागली. तो जगातला एक ‘नामवंत’ चित्रकार बनला इतके की यामध्ये तो स्वत:चे कुरुप असलेले रुपही विसरून गेला आणि आयुष्यात खूप मोठ्या यशोशिखरावर पोहोचला! का? केवळ त्याने लवकरात लवकर स्वत:ला चांगल्या प्रकारे ओळखले. म्हणून…. आयुष्यामध्ये दुस-यानां ओळखण्यापेक्षा आधी स्वत:ला ओळखायला शिका म्हणजे यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही….!
satish ukharde

Website Title: Learn to recognize yourself Satish ukharde


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here